चिपळूण (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजना ही एक चळवळ आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी कार्यशाळा आहे. शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वाला पैलू पाडणारी जणू बिनभिंतींची शाळाच आहे, असे मत प्रा. विनायक बांद्रे यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिनी व्यक्त केले. ते डीबीजे महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी उपप्राचार्य डॉ. एम. एस .चांदा उपस्थित होते. येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून प्रा. विनायक बांद्रे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ उत्तमराव सूर्यवंशी यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असते. यातून विद्यार्थी घडत असतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या मनोगतामध्ये प्रा. विनायक बांद्रे यांनी राष्ट्रीय सेवा योजना त्याचा इतिहास सांगून राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना ही अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे.
यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, सर्वधर्मसमभाव, सामाजिकतेचे भान अशा विविध पैलूंची रोपण विद्यार्थी दहशत केले जाते. सध्याच्या संकुचित वृत्तीने जगणाऱ्या आपणा सर्वांना एनएसएस मानवतेच्या प्रांगणात नेणारे एक विचारधारा आहे. एनएसएस आपल्या मनाचे स्क्वेअर फुट वाढवते. त्याचे ब्रीद वाक्य ‘नॉट मी बट यू’ हा राष्ट्रीय सेवा योजनेचा उदात्त विचार आहे. यातूनच भावी सुजाण नागरिक घडतील. म्हणून एनएसएस हे सर्वांसाठी अनिवार्य केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.माधव बापट यांनी एनएसएस सप्ताहला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला सहकार्यक्रमाधिकारी प्रा. अर्चना कांबळी, प्रा.संजय शिंदे, प्रा.प्रथमेश डिंगणकर, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, प्रा. अरूण जाधव, प्रा. विठ्ठल कोकणी, प्रा.प्रदीप वळवी आदी शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सानिया बर्वे हिने तर आभार अनुष्का रोकडे हिने केले.












