भगतसिंग यांची देशभक्ती सांगणारा चलतचित्र देखावा

चिपळूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम

चिपळूण (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव शहरातील माधव सभागृहात सालाबादप्रमाणे अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. सामाजिक उपक्रम केवळ गणेशोत्सवात नव्हे, तर वर्षभर राबविणाऱ्या या मंडळाने यंदा शहीद भगतसिंग यांच्या देशभक्तीचे कौतुक करणारा चलतचित्र देखावा सादर केला असून त्याचे कौतुक भाविकांकडून होत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला अनेक वर्षांची परंपरा आहे. येथील चलतचित्र देखावा दरवर्षी समाजाला काही ना काही संदेश देण्यासाठी साकारला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोहन मिरगल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा भगतसिंग यांच्या जीवनावरील चलतचित्र देखावा दाखविण्यात आला आहे. वडिलांकडून मिळालेले देशभक्तीचे संस्कार, जालियनवाला बाग हत्याकांडातून मनामध्ये जागृत झालेली क्रांतिकारी भावना, इंग्रज अधिकाऱ्यांवर झाडलेली गोळी ते अगदी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना झालेली फाशी असा जीवनपट उलगडणारे हे चलतचित्र सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी विविध उपक्रम राबवत असते. विविध स्पर्धा आयोजित करीत असते. वर्षभर विविध सामाजिक काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. गुणवंतांना शिष्यवृत्ती दिली जाते, शिवाय चलतचित्र देखाव्यातून गणेशोत्सवात लोकांची जनजागृतीही केली जाते. हा चलतचित्र देखावा घारे पेंटर, प्रसाद ओक व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केला आहे.