गवाणे येथून वयोवृद्ध व्यक्ती बेपत्ता

लांजा(प्रतिनिधी) फिरायला जातो सांगून घराबाहेर पडलेले तालुक्यातील गवाणे गुरववाडी येथील वयोवृद्ध व्यक्ती गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत.याप्रकरणी नातेवाईकांनी लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम रामा गुरव (वय-७२, रा.गवाणे गुरववाडी, ता.लांजा, जि.रत्नागिरी) हे मंगळवार दि.२६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी सारिका शांताराम गुरव (रा.गवाणे गुरववाडी, ता.लांजा) हिला वाडीत फिरण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेले. त्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांचा घरातील व्यक्तींनी तसेच नातेवाईकांनी घराच्या आजूबाजूतील परिसरात त्यांचा शोध घेतला. नातेवाईकांकडे फोन करून चौकशी केली, सर्वत्र शोध घेऊनही दुसऱ्या दिवशी देखील काहीच थांगपत्ता लागत नसल्याने अखेर त्यांचा नातेवाईक दिलीप शंकर गुरव (वय-५६, रा.गवाणे गुरववाडी, ता.लांजा) यांनी बुधवार दि.२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लांजा पोलीस स्थानकात शांताराम गुरव बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

शांताराम गुरव यांची उंची ५ फूट ७ इंच, रंग सावळा, चेहरा उभट व गाल आत गेलेले, अंगाने सडपातळ, केस पिकलेले व पुढील बाजूस टक्कल, दाढी व मिशी काढलेली, अंगात आकाशी रंगाचा हाफ टी-शर्ट व नेसणीस पांढऱ्या रंगाची हाफ पॅन्ट तिच्यावर काळे पट्टे असून पायात पावसाळी साधी चप्पल आहे.

तरी या वर्णनाची व्यक्ती कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलीस स्थानकात संपर्क साधावा असे आवाहन लांजा पोलीसांच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पो.हेड.कॉन्स्टेबल एन.एस.नावलेकर करत आहेत.