केळवत घाटामध्ये दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प

मंडणगड : प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यामध्ये दिनांक 1 ऑक्टोबर रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मंडणगड दापोली राज्य मार्गावरील केळवत घाटामध्ये रात्री आठच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दरड रस्त्यावर आल्याने या मार्गावर जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला हे वृत्त कळताच बांधकाम विभागाने जेसीबीच्या साह्याने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर करत वाहतूक सुरळीत केली.दापोली – मंडणगड हा राज्यमार्ग रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. दापोलीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक याच मार्गावरून होते. त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. दरम्यान

या मार्गावरील आलेली दरड बाजूला करून प्रशासनाने वाहतूक पूर्ववत केली असली तरी डोंगराकडील भागातून दरड पुन्हा मार्गावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील अनेक वर्ष केळवत घाटात बदलत्या काळातील रहदारीच्या अनुषंगाने कोणतीही डागडुजी अथवा नूतनीकरण करण्यात आले नाही. दरडीकडील बाजूस रुंदीकरण झालेले नाही तसेच दरीकडील बाजूस संरक्षण भिंत अथवा मेटल बॅरिकेट्स चे संरक्षण उभारण्यात आले नाही. त्यामुळे केळवत घाटामध्ये नेहमीच अपघातांची मालिका पहावयास मिळते. घाटाचे नूतनीकरण अथवा रुंदीकरण करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून नागरिक, माध्यमे व लोकप्रतिनिधी करत आहेत मात्र मागणीबाबत प्रशासनाची उदासीनता कायम आहे.