–आणि हरिनामाच्या नामस्मरणात रंगले फोंडावासीय !

अबाल-वृद्ध पुढील सात दिवस भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन

 फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : भाद्रपद वद्य षष्ठी अर्थात तारीख ४ ऑक्टोबर २३ पहाटे मंदिरात,श्री देव राधाकृष्ण देवतांची पूजाअर्चा अभिषेक पार पडला. त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहचा संकल्प करून, पुरोहितांच्या मंत्रोच्चारात आणि सनईच्या सुमधुर संगीतावर *”चार बाजूला चार केळी, समई लावल्या दोन | चौरंगाच्या मध्ये बसला, आमचा नारायण ||”* च्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली.घटाची पूजाअर्चा संपन्न होण्यापूर्वी गावच्या मानकरी यांनी गजानन- राधाकृष्ण सह सर्व देवतांना, विघ्ने दूर करून उपक्रमाची यशस्विता आणि बालगोपाळांच्या संरक्षणासह उत्कर्षासाठी सांगणे केले. विणाधारकांने अखंड वीणा धारण केला. अन फटाक्यांची एकच आतषबाजी झाली.मारुती मेस्त्री यांनी मृदंगाच्या तालावर हरिनामाची पदे खड्या आवाजात आळवून सुरुवात केली. आणि त्या तालावर बालगोपाळ अबालविरुद्ध हरिनामाच्या जयघोषात नाचु – गाऊ लागले.

हा उत्सव यापुढील सात दिवस अखंड चालू राहणार असून, नित्य पूजेसोबत, फोंडा शाखेच्या जीवनविद्या मिशनचा उपासना यज्ञ, हरिपाठ, कलावती आई मंडळाचे भजन, आर. के.ग्रुप च्या खुल्या भजन स्पर्धा, स्थानिक निमंत्रित भजने ,डबलबारी, रंगीत संगित दिंडी, महिलांसाठी हळदीकुंकू, मुलांसाठी फनी गेम्स,सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्य भरगच्च उपक्रमांचे आयोजन बालगोपाळांकडून करण्यात आले आहे.

तरी या सात दिवसात हरिनामाच्या उपक्रमामध्ये सर्व भाविकांनी सहभागी होऊन सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन श्री देव राधाकृष्ण मंदिर वैश्य समाज पदाधिकारी- सदस्य आणि बालगोपाळ मंडळाकडून करण्यात आलेले आहे..

*चौकट*

घटस्थापनेनंतर बालगोपाळ मंडळाकडून, श्री देव राधाकृष्ण मंदिर वैश्य समाज पदाधिकाऱ्यांकडे मंदिरात, पालखी प्रदक्षिणेसाठी श्रीकृष्णाची चांदीची भव्य मूर्ती प्रदान करण्यात आली. या दातृत्वाचे पंचक्रोशी मध्ये कौतुक होत आहे.