चिपळूण पालिकेकडून दोन घंटागाड्यांचे नियोजन

 

चिपळूण  : स्वच्छ व सुंदर चिपळूण शहरासाठी सोमवारी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगर पालिकेने शहरातील पाग परिसरात कचरा वर्गीकरणासंदर्भात जनजागृती केली. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दोन घंटागाड्या सुरू केल्या आहेत. या उपक्रमाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनासाठी आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांच्यासह त्यांचे सहकारी स्वच्छतेसाठी विशेष मेहनत घेत आहेत. शहरात स्वच्छता नांदावी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात संकलित होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असून ओला व सुका कचरा संकलनासाठी वेगवेगळ्या घंटागाड्याही उपलब्ध केल्या आहेत. त्यानुसार महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत शहरातील प्रभाग एकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर संपूर्ण कचरा वर्गीकरण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याकरिता जनजागृती करण्यात आली. कचरा वर्गीकरणासाठी दोन घंटागाड्यांचे नियोजन केले आहे. लवकरच संपूर्ण शहरातही हा उपक्रम राबिवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांनी दिली.