राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांची लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरास भेट

 

चिपळूण :: महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी नुकतीच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला भेट दिली. रत्नागिरी येथे झालेल्या ग्रंथोत्सवासाठी ते रत्नागिरीला आले होते. मुंबईला परत जाताना त्यांनी आवर्जून लोटिस्माला भेट दिली. लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे कार्यवाह सुमेध करमरकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गाडेकर यांचा

उपरणे आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. लोटिस्माने देशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे झाली त्या निमित्ताने चिपळूण४२ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. चिपळूण येथे झालेल्या चलेजाव आंदोलनात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांच्या आंदोलनावर हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असल्याचे यावेळी धनंजय चितळे यांनी सांगितले. लोटिस्माचा हा ग्रंथ उपक्रम कौतुकास्पद आहे अशी शब्दात गाडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे त्यांच्या समवेत योगेश पिंपळे (लेखाधिकारी ग्रंथालय संचालनालय), विवेक जाधव, अशोक सन्माने उपस्थित होते. ग्रंथालयाचे बाळशास्त्री जांभेकर सभागृह व कलादालनालाही मान्यवरांनी भेट दिली. लोटिस्माचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर तसेच डॉ. आंबेडकर वाचनालयाचे संचालक शरद तांबे यांनी कलादालनाची माहिती दिली. चिपळूणचे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर हे एक आदर्श ग्रंथालय आहे. परिसरातील शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यायला हवा असा विचार गाडेकर यांनी व्यक्त केला.