प्रा. सौ. रोहिणी दीपक ओतारी ठरल्या शिक्षणरत्न पुरस्काराच्या पहिल्या मानकरी

चिपळूण (प्रतिनिधी) : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्यातर्फे प्रथमच देण्यात येणारा शिक्षण रत्न पुरस्कार हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, पिंपळी, चिपळूणच्या प्राचार्या सौ. रोहिणी दीपक ओतारी यांना देण्यात आला. हा पुरस्कार सोहळा गुहागर येथील लेटन फॉर्म येथे दिनांक १ ऑक्टोंबर रोजी संपन्न झाला.

प्राध्यापक संजय कशिद रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष, पर्यटन व्यावसायिक महासंघ तसेच दापोली तालुका अध्यक्ष श्री. नकाते, खेड तालुका अध्यक्ष श्री. राठोड व चिपळूण तालुका अध्यक्ष सौ. रेश्मा तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्राचार्या सौ. रोहिणी ओतारी यांनी केलेल्या उल्लेखनीय अशा शैक्षणिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना आधीच राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पारितोषिके मिळाले आहेत. या सर्व शैक्षणिक कार्याची दखल घेत प्रथमच यावर्षी सुरू करण्यात आलेला शिक्षण रत्न २०२३ हा पुरस्कार पर्यटन व्यावसायिक महासंघ विभाग कोकण यांच्यामार्फत त्यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ रोहिणी दीपक ओतारी यांचे भरभरून कौतुक करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कामकाजाविषयी अभिमान व्यक्त करून त्या आपल्या कोकणाचे नाव एक जागतिक पातळीवर नक्कीच लवकरात लवकर घेऊन जातील अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात प्रियंका सावंत, सचिन बेर्डे व रुपेश वीर यांना देखील सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारानंतर सौ. रोहिणी ओतारी यांनी असे आश्वासन दिले की, कोकण पर्यटन विकासासाठी पर्यटन महासंघासोबत कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट नेहमी कृतिशील राहील व लागेल ते सर्व सहकार्य करेल. पर्यटन वाढीसाठी व होम स्टे प्रसिद्धीसाठी रोहिणी ओतारी यांनी बरेच अशा नवनवीन संकल्पना या ठिकाणी मांडल्या. त्या सर्वांचे सुद्धा इतरांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी अलोरे पोलीस स्टेशनचे दीपक ओतारी तसेच प्राचार्य ललित कांडवेलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.