दापोली उपजिल्हा रुग्णालयाची मदार कायमस्वरूपी परिचारीका व बी.ए.एम.एस कंत्राटी डॉक्टरांवर
रुपेश वाईकर (दापोली प्रतिनिधी) नांदेड जिल्हा रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे. रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती जाणुन घेण्याकरिता रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी दुरदृश्यप्रणालीव्दारे जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, वैद्यकीय अधिक्षक यांची आढावा बैठक घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी, परिविक्षाधीन आय. ए. एस, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी शुक्रवार पासुन शासकीय रुग्णालयांना भेटी देवून पाहणी करावी तसेच प्रांताधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांची पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गुरुवारीच दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसार गुरुवारी रात्री अचानक दापोलीचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन सुरक्षा व उपाय योजना यांची पाहणी केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजाचे त्यांनी कौतुक करताना समाधान देखील व्यक्त केले. यावेळी डॉ. चंद्रशेखर गोडकर,इंनटर्न डॉ. निहार पाटिल, परिचारिका साक्षी हांडे, परिचारिका स्नेहल गोपने, परिचारिका स्वप्नाली दाभोळकर, कक्ष सेवक संतोष झिमण, शिकाऊ परिचारिका ऋषिकेश खेडकर, संतोष पावरा, संकेत भोंडकर, स्वरांजली खेडेकर, जागृती झगडे, विनया मुर्चावडे-स्वच्छता कर्मचारी, गौरत सिक्युरिटी आदी उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
*जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचेकडुन व्हिडीओ काँलव्दारे पाहणी*
दरम्यान दापोली उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी दरम्यान रत्नागिरी चे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दापोली प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचेकडे व्हिडीओ काँलव्दारे दापोली उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करत कंत्राटी बी.एम.एस. डॉक्टर्स, परिचारिका यांचेशी विचारपूस करीत मार्गदर्शन केले.
*उपजिल्हा रुग्णालयातील सर्वच विभागाची पाहणी*
नांदेड जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन सुरक्षा यंत्रणांसह आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली होती, त्याच धर्तीवर आज दापोली प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी गुरुवारी रात्री अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी जनरल पुरुष वार्ड, जनरल स्त्री वार्ड, आँपरेशन थिअटर, औषध विभाग, ओपीडी विभाग, आयपीडी विभाग, स्वच्छतागृह आदी भागांची पाहणी करत नातेवाईक यांचेशी देखील संपर्क साधत व्यवस्थेची माहिती घेतली.
*उपजिल्हा रुग्णालय तज्ञ डॉक्टरविना*
दापोली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वच पदे रिक्त आहेत. वर्ग- १ चे पद रिक्त असून वर्ग २ ची ७ पदे मंजूर असून त्यातील २ पदे भरली आहेत. . यातील डॉ. बालाजी सगरे (स्त्री रोग तज्ञ) हे अन्य ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यरत आहेत तर डॉ. महेश भागवत यांची बदली कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात झाली आहे. यामुळे दापोली उपजिल्हा रुग्णालयात एकही कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी कार्यरत नाही. उद्या एखादी वाईट घटना घडली तर उपजिल्हा रुग्णालयात एकही तज्ञ डॉक्टर तसेच एम.बी.बी.एस डॉक्टर या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत नाहीत.
*उपजिल्हा रुग्णालयाची मदार कायमस्वरूपी परिचारीका व बी.ए.एम.एस कंत्राटी डॉक्टरांवर*
दापोली उपजिल्हा रुग्णालयात आयुष-१ व आयपीएचएस अंतर्गत आरबीएसके अंतर्गत ६ असे ७ वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहेत. दापोली उपजिल्हा रुग्णालयात एकही तज्ञ डॉक्टर नसताना दापोली उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर्स आपली सेवा देत आहेत. या डॉक्टरांच्या जोडीला उपजिल्हा रुग्णालयातील सर्वच तज्ञ परिचारिका आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत, याच परिचारीकांमुळे दापोली उपजिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाधान व्यक्त करीत आहेत. गेले चार महिने उपजिल्हा रुग्णालयात एकमेव कंत्राटी पद्धतीवर स्त्री रोगतज्ञ कार्यरत होते तेही सोडून गेल्याने गरोदर मातांचे खुप हाल होत आहे.
*उपजिल्हा रुग्णालयात तीन महिन्यात १५५७८ रुग्णांवर उपचार*
दापोली तालुक्यात मागील तीन महिन्यात तब्बल बाह्यरुग्ण विभागात 14664 व आंतररुग्ण विभागात 914 एवढ्या रुग्णांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आहेत. डॉक्टरांची संख्या कमी असतानाही डेंग्यू व अन्य आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. तीन महिन्यात सेफ्टिक शॉकने 1 जणांचा मृत्यू झाला आहे.












