रत्नागिरी ः प्रतिनिधी : बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करत तरुणाची तब्बल 6 लाख 75 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.ही घटना शनिवार 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.42 ते 1.57 वा.कालावधीत घडली आहे.याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ शर्मा आणि बँकेचा कस्टमर केअर प्रतिनिधी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्याविरोधात सुनिल लक्ष्मण घवाळे (36,सध्या रा.रहाटाघर,रत्नागिरी मुळ रा.कळंबट घवाळवाडी चिपळूण)यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,शनिवारी सुनिल घवाळे यांनी त्यांच्या कामकाजासाठी बँक ऑफ इंडिया शाखा रामपूर या बँकेचा संपर्क क्रमांक गुगलवर सर्च केला होता.तेथे उपलब्ध असलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यावर तेथील व्यक्तीने त्याचे वरिष्ठ तुमच्याशी संपर्क साधतील असे सांगितले.काही वेळाने सौरभ शर्माने सुनिल घवाळे आणि त्यांच्या पत्नीशी संपर्क साधला.आपण बँक ऑफ इंडियाचा अधिकारी बोलत असल्याचे भासवून प्ले स्टोअरवरुन एक अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडून एटीएममध्ये जाण्यास सांगितले.त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुनिल घवाळे एटीएममध्ये गेल्यानंतर सौरभ शर्माने त्यांना ऑनलाईन बँकिंग हा पर्याय निवडण्यास सांगितले.त्यानंतर त्याने सांगितलेले दहा अंकी दोन कन्फर्मेशन कोड त्यामध्ये नमूद केले असता फिर्यादीच्या बँक खात्यातून दोन ट्रॅन्झॅक्शनव्दारे एकूण 6 लाख 75 लाख रुपये काढून फसवणूक केली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुनिल घवाळे यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 419,420,34 महिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











