‘गाडी मागे घे’ सांगणाऱ्या एसटी वाहकाला शिवीगाळ करणाऱ्या कारचालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः प्रतिनिधी

अरुंद रस्त्यावर गाडी मागे घे असे सांगितल्याच्या रागातून एसटी वाहकाच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करुन त्याला शिवीगाळ करणार्‍या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शनिवार 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.50 वा.केळे गावातील वाघधरे स्टॉपकडे जाणार्‍या रस्त्यावर घडली.

जैद जुबेद मजगावकर (रा.केळे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात एसटी वाहक मनोज बबनराव पिंगळे (35,रा.वाशिम) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,शनिवारी सायंकाळी (एमएच-14-बीटी-4462) या म्हामूरवाडी ते रत्नागिरी जाणार्‍या एटीतून फिर्यादी हे वाहक म्हणून जात होते.एसटी केळे गावातील वाघधरे स्टॉपजवळ आली असता तेथील वळणावर समोरुन जैद मजगावकर आपल्या ताब्यातील कार (एमएच-08-एएन-7353) घेउन येत होता.तेथील रस्ता अरुंद असल्याने वाहक मनोज पिंगळे यांनी जैदला गाडी मागे घे असे सांगितले.

याचा राग आल्याने त्याने पिंगळे यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली.त्यानंतर एसटीमध्ये येउन त्यांच्या सरकारी गणवेशाचे शर्ट ओढून त्याची दोन बटणे तोडून ते शुटिंग करत असलेला मोबाईल आणि त्यांच्याकडील तिकिटाचे पैसे ओढून घेउन ते गाडीतच फेकून देउन नुकसान केले.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम 353,427,504,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.