सावंतवाडी पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्यांवर “अशी” झाली कारवाई

लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरिक्षक लाचलुचपतच्या ‘जाळ्यात ‘ 

रायगड लाचलुचपत विभागाची सावंतवाडी पोलीस ठाण्यातच कारवाई  

अन्य एका पोलीस अधिकार्‍यावरही गुन्हा दाखल  

सावंतवाडी । प्रतिनिधी :

फ्लॅटविक्री संदर्भातील फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकलेल्या बिल्डरकडून तडजोड करण्यासाठी एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर खंडागळे याला रायगड येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई आज सायंकाळी ६ वाजून २२ मिनीटांच्या सुमारास चक्क सावंतवाडी पोलीस ठाण्यातच करण्यात आली. याबाबतची तक्रार बिल्डर सिद्धांत परब यांनी केली होती.
दरम्यान, या प्रकरणी सूरज पाटील नामक एका पोलीस उप निरीक्षकावर तक्रार दाखल असून त्याला देखील ताब्यात घेण्यात येणार आहे. सदरचा अधिकारी हा व्हीआयपी दौऱ्यात स्कॉडवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबतची कारवाई सुरु होती.
सदरची कारवाई ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे व उपअधिक्षक अनिल गेर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड लाचलूचपत विभागाचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सहा. पोलीस निरीक्षक विनोद जाधव, हवालदार महेश पाटील, कौस्तुभ मगर, विवेक खंडागळे, पोलिस नाईक सचिन आटपाटकर आदींच्या पथकाने केली.
याबाबतची तक्रार बिल्डर सिद्धांत परब यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात ८ ऑक्टोबर रोजी ठाणे लाचलूचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ठाणे लाच लुचपत विभागाचे पथक जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी दाखल झाले होते. ते संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या पाळतीवर होते. या संदर्भात संबंधित बिल्डरसोबत संशयित सागर खंडागळे व अन्य एका पोलीस उप निरीक्षकाच्या बैठकाही झाल्या. यात सिद्धांत परब यांचे सहकारी असलेल्या एका सैनिकावर असलेल्या गुन्हा दाखल असल्याने त्याबाबत तडजोड करण्यासाठी दीड लाखाची लाच मागितली होती.
त्यानंतर संबंधित पथकाच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास बिल्डर सिद्धांत परब यांनी सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलीस ठाण्यातच कोठडीच्या समोर सदरची १ लाखाची रक्कम ताब्यात घेताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने सागर खंडागळे याला रंगेहात ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत याबाबतची कारवाई सुरु होती. रात्री ८ च्या सुमारास सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाचे उप अधिक्षक अरुण पवार यांच्यासह पथक सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांच्याच ताब्यात संशयित सागर खंडागळे याला ताब्यात देण्यात येणार आहे.
संशयित सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे सहा महिन्यापूर्वीच सावंतवाडी पोलिस ठाण्यात हजर झाले होते. तर उप निरीक्षक सुरज पाटील सुमारे अडीज वर्षांपासून सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धती विरोधात सावंतवाडी पोलिसांतही कुरबुर होती. यापूर्वीही अनेक  प्रकरणांमध्ये पाटील याने अर्थ पूर्ण तडजोड केल्याची चर्चा राजरोसपणे सुरु होती. त्यामुळे सूरज पाटील यानेच या प्रकरणात  सागर खंडागळे याला अडकवला असल्याचेही बोलले जात आहे.

*अशी झाली कारवाई*

सायंकाळी ६ च्या सुमारास बिल्डर सिद्धांत परब हे सावंतवाडी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलीस ठाण्यातील कोठडीच्या परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याच्या हातात १ लाख रुपयांची रोख रक्कम दिली. याच वेळी पाठीमागून साध्या वेशान दाखल झालेल्या रायगड लाच लुचपत विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्यात काही काळ झटापटही झाली. याच दरम्यान पोलीस ठाण्यात एका पती पत्नीतील भांडणाचे प्रकरण नोंद करण्याचे काम सुरु होते. याचवेळी पोलीस ठाण्याच्या बाहेर रायगड पासिंगची एक इन्होव्हा व एक ब्रेझा गाड्या दाखल झाल्या. मात्र, त्यातील अधिकारी साध्या वेशात असल्याने पोलीसांना पती पत्नी भांडण प्रकरणातील या व्यक्ती असाव्यात असा समज झाल्याने उपस्थित असलेल्या काही अधिकार्‍यांनीही त्या ठिकाणी धाव घेतली व सागर खंडागळे यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. याच वेळी पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी आपले ओळखपत्र दाखवत कारवाई करीत असल्याचे स्पष्ट करताच सारे मागे हटले.

*फ्लॅटविक्रीसंदर्भात फसवणुकीचा बिल्डरवर होता गुन्हा*

या प्रकरणातील तक्रारदार सिद्धांत परब हा सावंतवाडी शहरातील प्रख्यात बिल्डर आहे. त्यांच्या सावंतवाडी भटवाडी येथील निवासी संकुलातील एका फ्लॅटच्या खरेदी प्रकरणात आपली फसवणूक झाल्याची तक्रार शहरातील अशोक पवार नामक एका व्यक्तीने बिल्डर सिद्धांत परब यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात केली होती.
या तक्रारीत आपण सिद्धांत परब यांच्याकडून सदर सदनिकेतील एक फ्लॅट विकत घेतला होता. मात्र, सदरचा फ्लॅट परब यांनी परस्पर दुसऱ्याच एका व्यक्तीला विकला. तसेच त्याच फ्लॅटवर एका वित्तीय संस्थेकडून कर्जही काढले होते. त्यामुळे या प्रकरणी आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार पवार यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यानुसार त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात त्यांना जामीनही मंजूर झाला होता.
दरम्यानच्या काळात सिद्धांत परब यांनी ज्या सैनिक असलेल्या व्यक्तीला हा फ्लॅट विकला होता त्या व्यक्ती विरोधातही पवार यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार संबंधित व्यक्तीला गुन्ह्यात अडकवण्याची भिती घालत संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व त्यांच्या एका सहकारी अधिकार्‍याने या प्रकरणी तडजोड करण्यासाठी बिल्डर सिद्धांत परब यांच्याकडे दीड लाखाची लाच मागितली होती. याच प्रकरणी सागर खंडागळे यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

सावंतवाडीतील अलिकडील तिसरी कारवाई

सावंतवाडी पोलीस विभागातील अलिकडच्या काळात झालेली लाच लूचपत विभागाची ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी सावंतवाडीचे तत्कालिन  पोलीस उपविभागीय अधिकारी विठ्ठल जाधव यांना दहा लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. तर त्यानंतर सावंतवाडीतील एका राजकीय पुढार्‍याकडून लाच घेताना तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आज ही कारवाई झाल्याने पोलीसांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.