सावंतवाडी पोलीस ठाण्याची प्रतिमा ‘मलीन ‘
अंतर्गत हेवेदावे व वरिष्ठांचे अक्षम्य दुर्लक्ष
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याला गुरुवारी सायंकाळी रायगड येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. फ्लॅट विक्री प्रकरणात एका बिल्डरवर फसवणूक प्रकरणी असलेल्या गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी एक लाखांची लाच स्वीकारताना तो जाळ्यात सापडला. मात्र, प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात लाच स्वीकारण्यापर्यंत एका अधिकाऱ्याची मजल कशी गेली व एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर ही वेळ का आली हे सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मुलं जर बिघडली तर पालकांची तेवढीच जबाबदारी असते त्यामुळे आपल्या हाताखाली काय चालले आहे याची कल्पना असूनही काही लोकांना पाठीशी घालणारे वरिष्ठही या सर्व प्रकरणात तेवढेच जबाबदार आहेत कारण या प्रकरणामुळे एकंदरीतच पोलीस विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुरूवारी घडलेल्या लाच स्वीकारण्याच्या प्रकरणानंतर या पोलिस ठाण्यांतर्गत घडत असलेल्या अनेक रंजक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये असलेले अंतर्गत हेवेदावे, बेबनाव, कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेले गैर प्रकार आणि त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष यामुळेच एखाद्या तक्रारीतून वा गुन्ह्यात एखादा ‘ बडा ‘ मासा गळाला लागला की ‘ संधी ‘ चालून आली अशीच काहिशी परस्थीती सावंतवाडी पोलिस ठाण्याची झाल्यानेच एवढ्या मोठ्या रक्कमेची लाच घेण्याचे धाडस या अधिकाऱ्यांचे झाल्याचे बोलले जात आहे.
एकेकाळी सावंतवाडी पोलीस ठाणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आदर्श पोलीस ठाणे म्हणून त्याचा नावलौकिक होता. या पोलिस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांनी गुन्हेगारी क्षेत्राचा बिमोड करतानाच पोलिसांचा एक वेगळा धाक निर्माण केला होता. मात्र, अलीकडील काळात ही ओळख पुसली जात असून त्याला बदनामीचा कलंक लागत आहे. याच पोलीस ठाण्यांतर्गत तीन तीन अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात सापडतात हे कशाचे द्योतक आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध धंद्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले असून ना कुणाला धाक राहिला आहे ना कुणाची भिती अशी परिस्थिती आहे. एवढेच नव्हे तर अवैध धंदेवाईकाचे सोबतीच काही पोलिस बनल्याने कारवाई नेमकी कुणी व कुणावर करणार असाच प्रश्न निर्माण झाला आहे.
कालच्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे जाळ्यात अडकला. मात्र, ज्याने लाच मागितली तो बाजूला राहिला. या प्रकरणी संशयित असलेल्या दुसऱ्या अधिकार्याचे अनेक कारनामे या निमित्ताने उघडपणे चर्चिले जाऊ लागले आहेत. यापूर्वी तीन ते चार वेळा त्याला ट्रॅप लावण्यात आला होता मात्र त्यातून तो निसटला. यावेळीही तो नेमका दुसरीकडे असल्याने बाजूला राहिला. यापूर्वीही आंबोलीतील एका खून प्रकरणातील तपासात तसेच माडखोल येथील एका गुन्ह्याच्या तपासादरम्यानही तो अडचणीत आला होता. मात्र, त्यावेळी त्याला पाठीशी घालण्यात आले अशी चर्चा आहे.
अलिकडील अवैध धंद्याच्या एका प्रकरणातही मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण तडजोड झाल्याची चर्चा राजरोसपणे सुरु आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेले व एका विभागीय कार्यालयाच्या समोर असलेल्या एका ‘चहापाना ‘च्या हॉटेलमध्ये या तडजोडी केल्या जायच्या अशीही चर्चा आहे. मात्र, याबाबतची कुणकुण लागूनही वरिष्ठांचे त्याकडे होत असलेले दुर्लक्ष निश्चितच विचार करायला लावणारे आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात अलीकडील काळात पोलीस निरीक्षक पदावर कायमस्वरूपी अधिकारी नेमला गेलाच नाही. मागील चार ते पाच वर्षांचा विचार करता या पोलीस ठाण्यात चार ते पाच अधिकारी बदलून गेले. यातील काही जणांकडे काही महिन्यांसाठी प्रभारी म्हणून कार्यभार होता तर काही जणांकडे काही दिवसांपुरताच कारभार राहिला होता. एका दिवसातही बदली झाल्याचे प्रकार या पोलीस ठाण्यात घडले आहेत. त्यामुळे वरिष्ठांचीच खुर्ची ‘दोलायमान ‘ असल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांना कुणाचा वचक राहिला नाही. यातूनच काहीजण ‘सोकावले ‘ गेले असल्याचेही उघडपणे बोलले जात आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत प्रखर भूमिका घेत सावंतवाडी पोलीस ठाण्याची मलीन होत असलेली प्रतिमा सावरण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे.
दुसरी बाजू पहाता प्रसंगी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता तसेच दिवसरात्र सेवा करताना स्वतःकडे व स्वतःच्या संसाराला वेळ देऊ न शकणाऱ्या या अधिकार्यांवर ही अशी लाच घेण्याची वेळ येतेच का हा देखील तेवढाच महत्वाचा विषय आहे. केवळ पोलीस विभागच नाही तर महसूल, बांधकाम वा अन्य विभाग यात कोणीच स्वच्छ राहिले नाहीत. प्रत्येकाची पद्धत वेगळी एवढेच. बदललेले राहणीमान, आलिशान बंगला, गाड्या व रुबाब यातून सरळमार्गाने मिळणारे उत्पन्न तोकडे पडू लागते व त्यातूनच वाम मार्गाकडे वळले जाते हेच वास्तव आहे.
पोलीस खात्यात अशा अधिकार्यांवर अनेक गुन्हे कामांचा तपास सोपविला जातो. जिल्ह्यातच नव्हे तर काही प्रकरणात राज्याच्या बाहेरही तपासासाठी जावे लागते. तपासासाठी वापरण्यात येणारी खाजगी वाहने, संगणक, प्रिंटर, लॅपटॉप यासारखी महागडी पण खाजगी साधने याचा खर्च म्हणजेच तपासनिधी योग्य प्रमाणात दिला जातो का याबाबत पर्यवेक्षण अधिकारी लक्ष देतात का हा देखील एक भाग आहे. तपास बिलं मिळत नाहीत, प्रवास भत्ता दिला जात नाही, गोपनीय फंड मिळत नाही अशा अनेक तक्रारी यातील काही अधिकारी करताना दिसतात. त्यातूनच वाढलेले खर्च, तुटपूंजे पगार व आलिशान राहणीमान यातूनच अधिक पैशांच्या हव्यासापोटी असे प्रकार राजरोस घडत असतील तर त्याला ‘ सिस्टीम ‘ ही तेवढीच जबाबदार म्हणावी लागेल.












