मालवण | प्रतिनिधी : प्लास्टिक पिशव्या वापर प्रकरणी मालवण नगरपरिषदेने सोमवार आठवडा बाजार दिवशी धडक कारवाई केली. दहा व्यापाऱ्यांकडून सुमारे 15 ते 20 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केले असून चार हजार रुपये दंड ठोठावत वसुल केला आहे.
नियमानुसार प्लास्टिक पिशव्या बंदी असतानाही काही व्यापारी कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी आठवडा बाजारात स्वच्छता निरीक्षक रुपेश जाधव, कर्मचारी सागर जाधव, मिथुन शिगले यांनी धडक कारवाई केली. सर्व व्यापाऱ्यांकडे तपासणी केली. या कारवाईत 10 व्यापाऱ्यांकडे कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. सर्व प्लास्टिक पथकाने जप्त करत सुमारे चार हजार रुपये दंड वसुल केला आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.








