दांडियाच्या निमित्ताने हिंदू धर्मियांच्या देवतांचे होणारे विडंबन थांबवा

सकल हिंदू समाज लांजाची मागणी, तहसीलदारांना निवेदन सादर

लांजा (प्रतिनिधी) दांडियाच्या निमित्ताने हिंदू धर्मातील देव देवता, संत, राष्ट्रपुरुष यांचे होणारे विडंबन थांबवा, अशी मागणी सकल हिंदू समाज लांजाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना सादर करण्यात आले.

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, सध्या हिंदू धर्मियांचा नवरात्र उत्सव लांजा शहरासह तालुक्यात सुरू असून या उत्सवाच्या निमित्ताने शहर आणि तालुक्यात विविध नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दांडियाचे आयोजन केले जाते. या दांडीयाच्या निमित्ताने हिंदू धर्मियांच्या देवदेवता, संत, राष्ट्रपुरुष, सैनिक यांच्या वेशभूषा करून दांडिया खेळला जातो. त्यामुळे विडंबन होऊन आम्हा हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे सदर नवरात्रोत्सव मंडळांना अशा प्रकारची वेशभूषा करून विडंबन रोखण्यासाठी आपणाकडून मनाई आदेश किंवा सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन सादर करताना सकल हिंदू समाज लांजाचे सचिन कदम, तसेच डॉक्टर समीर घोरपडे, रुपेश चव्हाण व अन्य हिंदु समाज बांधव यावेळी उपस्थित होते.