
जिल्हाधिकारी किशोर तावडे व पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची उपस्थिती
सिंधुदुर्ग । प्रतिनिधी : पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधून वर्षभरात दिनांक १ ऑक्टोंबर २०२२ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारतातील विविध पोलीस दलामध्ये ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अस्सीम ध्येय निष्ठेने आपले कर्तव्य बजावित असताना विरगती प्राप्त झाली, त्या वंदनिय वीर श्रेष्ठांना श्रध्दांजली अर्पण करणेकरीता दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे परेड मैदानावर “पोलीस स्मृती दिन” साजरा करुन शहीदांच्या पवित्र स्मृतींना विनम्रपणे अभिवादन करण्यात आले.
ही “पोलीस स्मृती दिन” परेड श्री. किशोर तावडे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. मा. जिल्हाधिकारी यांनी प्रास्ताविकामध्ये शहीद वीरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करुन त्यांना आदरांजली वाहीली. त्यानंतर राखीव पोलीस निरीक्षक श्री. रामदास पालशेतकर यांचे नेतृत्वाखाली असलेल्या प्लाटूनने शोक सलामीव्दारे मानवंदना दिली.
२१ ऑक्टोंबर १९५९ रोजी लडाख मधील भारतीय सिमेवरील बर्फाच्छादीत व निर्जन अशा “हॉटस्प्रिंग” या ठिकाणी भारताचे १० पोलीस जवान गस्त घालत असताना अचानक दबा धरुन बसलेल्या चीनी सैनिकांनी त्यांचेवर हल्ला केला. या हल्ल्याला शेवटपर्यंत चोख प्रत्युत्तर देत असताना त्यांना विरगती प्राप्त झाली. या वीर जवानांनी आपल्या देशाच्या सिमेचे रक्षण करताना दाखविलेल्या या उच्च कोटीच्या शौर्याची गाथा इतरांना कळावी. तसेच राष्ट्र निष्ठेची व कर्तव्य निष्ठेची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत रहावी, म्हणून शहिद जवानांच्या स्मृतीपित्यर्थ २१ ऑक्टोंबर हा दिवस संपुर्ण भारत भर “पोलीस स्मृती दिन” म्हणून पाळला जातो.
याच दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे परेड मैदानावर “पोलीस स्मृती दिन” साजरा करुन शहीदांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी वर्षभरात दिनांक १ ऑक्टोंबर २०२२ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारतातील विविध पोलीस दलामध्ये ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अस्सीम ध्येय निष्ठेने आपले कर्तव्य बजावित असताना विरगती प्राप्त झाली अशा वीरांचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर सदर प्लाटूनने हवेत तीन वेळा गोळीबार करुन मानवंदना दिली.
शहीद जवानांना मानवंदना दिल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर तावडे व पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी शहीद पोलीस स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहीली. “पोलीस स्मृती दिन” परेडकरीता पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, तसेच मुख्यालयाचे बँड पथक उपस्थित होते.











