श्री देव धुतपापेश्वर मंदिर जिर्णोध्दाराचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊनच मार्गी लावा – ना. उदय सामंत

१२ वाडीतील प्रतिनिधींची समिती गठीत करण्याचे निर्देश
देवस्थान इनाम वगळलेल्या सातबारांवरील सर्व व्यवहार करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश

राजापूर | प्रतिनिधी : समस्त राजापूरवासीयांचे आराद्य दैवत असलेल्या धोपेश्वर येथील श्री देव धुतपापेश्वर मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊनच मार्गी लावण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले.

पुरातन आणि ऐतिहासिक वारसा आणि ठेवा असलेल्या या मंदिर जिर्णोध्दाराचे काम हे शासनाच्या वतीने रत्नागिरी जिल्हयात होत असलेले हे पहिलेच काम आहे. त्यामुळे ते दर्जेदार तर झाले पाहिजेच पण ऐतिहासिक वारसा जपून झाले पाहिजे, त्यामुळे स्थानिकांच्या सुचनांचा आदर करून, त्यांना विश्वासात घेऊनच हे काम मार्गी करावे अशा सक्त सूचना ना. सामंत यांनी एमएमआरडीचे अधिकारी, स्थानिक प्रशासन व संबधीत ठेकेदार कंपनीला दिल्या.

शासनाकडून राज्यातील पुरातन व प्रमुख मंदिरे जनत व संरक्षित करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हयातील राजापुरातील श्री देव धुतपापेश्वर मंदिराचा समावेश आहे. यासाठी सुमारे ११ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी व स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी रविवारी ना. सामंत हे धोपेश्वर गावात आले होते.

याप्रसंगी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी काम करताना विश्वासात घेतले जात नाही, योग्य प्रकारे काम केले जात नाही अशा तक्रारी केल्या. तर धोपेश्वर इनाम सातबारा सदरी दुरूस्ती होऊनही प्रशासनाकडुन त्याचा अंमल होत नसल्याचेही सांगितले.

यावेळी ना. सामंत यांनी या मंदिराचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊनच करावे लागेल असे नमुद करत अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १२ वाडयांतील ग्रामस्थांची एक समिती गठीत करण्याचे निर्देश यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले. प्रांताधिकारी याचे निमंत्रक रहाणार असुन मंदिर प्रशासकांसह या समितीत गावातील सर्व स्तरातील लोकांना सामावून घेऊन एक समिती गठीत करा आणि या समितीच्या नियंत्रणाखाली मंदिर जिर्णोध्दारासह धार्मिक सोहळयांचे नियोजन व काम चालेले अशा सूचना केल्या. यावेळी ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या गावाच्या बैठकीत सदस्यांची नावे निश्चित करून कळविण्यात येईल असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

देवस्थान इनाम सातबारा सदरी फेरबदल होऊनही अंमल होत नसल्याबाबत प्रश्नांवर अप्पर जिल्हाधिकारी यांनी तातडीने यावर निर्णय घ्यावा आणि दुरूस्तीचा अंमल सुरू करावा अशा सुचना ना. सामंत यांनी दिल्या.

खंडेवाडी, गुरववाडी पुर्नवसनाबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल, यासाठी ज्या जागा पहाण्यात आल्या आहेत त्याचा अहवाल पाहून निर्णय घेतला जाईल असेही ना. सामंत यांनी यावेळी सांगितले.

तर या सर्व प्रश्नांबाबत योग्य प्रकारे कार्यवाही होते की नाही हे पहातानाच गठीत करण्यात आलेल्या समितीची रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करून सर्व प्रश्न सोडविले जातील असेही ना. सामंत यांनी सांगितले.

याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी श्री. बर्गे, राजापूर प्रांताधिकारी वैशाली माने, राजापूर मंडळ अधिकारी बाजीराव पाटील, मंदिर प्रशासक श्री. चाळके यांसह शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, तालुका प्रमुख अशफाक हाजू, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, शहर प्रमुख सौरभ खडपे, माजी नगरसेवक संजय ओगले आदींसह १२ वाडयांतील ग्रामस्थ उपस्थित होते.