संस्थान आचरा गावचा ऐतिहासिक दसरोत्सव पारंपरिक पद्धतीने संपन्न

आचरा l अर्जुन बापर्डेकर : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचराचा ऐतिहासिक दसरोत्सव व शिवलग्न सोहळा मंगळवारी सायंकाळी अलोट गर्दीत आचरा वरची वाडी येथील फुरसाई मंदिराजवळ पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी सोनं लुटण्यासाठी आणि शिवलग्न सोहळ्यास भाविकांनी अलोट गर्दी केली होती.

दसऱ्यादिवशी सकाळ पासूनच माहेरवाशीणींनी फुरसाई मंदिराजवळ ओट्या भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या .सायंकाळी रामेश्वर मंदिराकडून श्रींच्या स्वारीसहीत देवाचे तरंग भाविकांच्या उपस्थितीत फुरसाई मंदिराजवळ आल्यावर सोनं लुटण्यासाठी उभ्या केलेल्या आपट्याची मानकरयांकरवी विधीवत पूजा केली गेली. त्यानंतर शिवलग्न सोहळ्यासोबत श्रींच्या भेटीनंतर बंदुकीच्या फैरी झाडत इशारा झाल्यानंतर सोनं लुटण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.

देवस्थानचे प्रथम मानकरी वहिवाटदार मिराशी यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला.यावेळी देवस्थान समिती , मानकरी देवसेवक यांच्या सह भाविकांची गर्दी उसळली होती.