अनधिकृत वाळू वाहतुक करणाऱ्या चार डंपरवर महसुल पथकाची कारवाई

 

रविवारी पहाटेच्या सुमारास अजुन एक डंपर ताब्यात ; चार डंपरना एकूण ६ लाखांचा दंड

एकावर उद्या होणार कारवाई ; तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांची माहिती

कणकवली : मागील काही दिवस अनधिकृत वाळू वाहतुकीबाबाबत तक्रारी वाढत चालल्या होत्या. पोलिसांबरोबरच आता तहसिलदार व महसुल पथक देखील ॲक्शन मोडवर आलेले दिसत आहे.

रविवारी पहाटे ६.३० वा.च्या सुमारास कणकवली- बिडवाडी येथून अनधिकृतरित्या वाळू वाहतुक करणाऱ्या चार डंपरवर महसुल पथकाने धडक कारवाई केली. यामध्ये वाहन क्रमांक (एम एच ०८ एच २३९९), (एम एच ०८ डब्लू ८४३३ ), ( एम एच ०८ एपी ५८७७ ), ( एम एच ०७ १९७६ ) हे डंपर महसुलच्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले. या वाहनांना अनधिकृतरित्या वाळू वाहतुक करीत असल्यामुळे कणकवली तहसिलदार कार्यालयात आणण्यात आले. त्यातील चार डंपरना ६ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
तसेच रविवारी रात्री पहाटेच्या सुमारास आचरा-तोंडवली-कालावल खाडीतून, आचरा-कणकवली किनई रस्त्याने रत्नागिरीच्या दिशेने अनधिकृतपणे वाळू वाहतुक करणारा डंपर पहाटेच्यावेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला दिसून आला. सुधिर नानासो माने (रा. बाज, ता.जत, जि.सांगली) सध्या रा.रत्नागिरी असे त्या डंपर चालकाचे नाव आहे. याबाबत त्याला थांबवुन पोलिसांच्या पथकाने चौकशी केली असता त्याने आपल्याजवळ वाळू वाहतुक करण्याचा परवाना नसल्याचे सांगितले.

दरम्यान, त्याला पोलिसांनी डंपरसह पोलिस ठाण्यात आणले. तहसिलदार व महसुल पथकाला यासंदर्भात माहिती दिली. यावेळी तहसिलदार दिक्षांत देशपांडे व महसुल पथक पोलिस ठाण्यात दाखल झाले. पुढील कारवाई करण्यासाठी पोलिसांनी सदरचा डंपर तहसिलदार व महसुल पथक यांच्या स्वाधिन केला.

याप्रकरणी तहसिलदार दिक्षांत देशपांडे यांच्याकडुन माहिती घेतली असता, पाचपैकी चार डंपरवर दंडात्मक कारवाई केली, असल्याचे त्यांनी सांगितले. तर पोलिसांकडुन ताब्यात देण्यात आलेला डंपर उशिरा ताब्यात मिळाल्यामुळे त्यावर सोमवारी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार दिक्षांत देशपांडे यांनी दिली.

या महसुल पथकाच्या कारवाईत तहसिलदार दिक्षांत देशपांडे, दोन सर्कल, मेघनाथ पाटील (मंडल अधिकारी), श्री. नागावकर (तळेरे मंडल अधिकारी) यांनी तर पोलिसांनी केलेल्या कारवाईत कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस हवालदार विनोद चव्हाण, पो. कॉ. किरण मेथे, राहुल राऊत, शैलेश म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मात्र, अचानक सुरू झालेल्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.