खेड Breaking : अमली पदार्थ विरोधात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; खेडमधील ४ महिने फरार विक्रेत्यालाही पकडले

खेड : शिवफाटा टोलनाका येथे  १२ जुन २०२३ रोजी रात्री २०.४० वा. च्या सुमारास पकडलेल्या गांजा प्रकरणातील सहआरोपी तब्बल चार महिने पोलिसांना गुंगारा देत होता. अटकपूर्व जामिनासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात सुद्धा धाव घेतली. मात्र तिथेही अर्ज फेटाळल्यानंतर पुन्हा कोर्टात हजर झालेल्या संतोष पुंडलिक काळे (वय ४७ वर्ष, रा. शिवरत्न नगर, भक्ती मार्ग पंढरपुर ) याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यानंतर अखेर त्याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिवफाटा टोलनाका येथे  १२ जुन २०२३ रोजी रात्री २०.४० वा. च्या सुमारास अनिल शिवराम चव्हाण ऊर्फ अनिल बुवा (वय- ५२ रा. खेड) हा गांजाची विक्री करताना खेड पोलिसांना सापडला होता. त्याच्यावर अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम 1985 कायदा कलम 8 (क), २० (ब) २ (ब) तसेच भा.दं.वि. संहिता कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल बुवा याला “गांजा” विक्री करिता सोलापूर जिल्ह्यामधील राहणार संतोष पुंडलिक काळे हा पुरवठादार असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

त्यानंतर सहआरोपी संतोष पुंडलिक काळे याला अटक करण्यासठी खेड पोलीस जंग जंग पछाडत होते.  मात्र संतोष पुंडलिक काळे पोलिसांना गुंगारा देत होता. या महिन्यात तो कुटुंबासह गायब झाला होता.  त्याचवेळी त्याने अटकपूर्व जमिनासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र यांनी दिनांक ०२/०९/२०२३ रोजी अतिरिक्त सत्र न्यायालय खेड, २७/०९/२०२३ रोजी उच्च न्यायालय मुंबई आणि १६/१०/२०२३ रोजी सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांनी काळेचा अर्ज फेटाळून लावला.  त्यामुळे आपली अटक टाळण्याकरिता करण्यात आलेले सर्व मार्ग बंद झाल्यानंतर संतोष काळे याला खेड पोलीस ठाणे येथे हजर होणे आवश्यक होते परंतु तसे न करता तो परस्पर दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी न्यायालया समोर हजर झाला परंतु न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.

खेड पोलीस ठाणे मार्फत आरोपीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला व आरोपी संतोष पुंडलिक काळे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले असू त्याला 07/11/2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे तसेच सदरची कारवाई, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी खेड श्री. राजेद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाणे येथील खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
1) पोलीस निरीक्षक, श्री. नितीन भोयर,
2) पोकॉ/१२९१ अजय कडू व
3) पोकॉ/ ९६२ ओहोळ