पुण्यातील पोर्शे कार प्रकरण : वडील, आजोबानंतर आता मुलाची आई येणार अडचणीत

पुणे: पुण्याच्या कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीनं मद्यपान करुन कार चालवल्याचा आरोप झाला. त्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात घेतले गेले. पण हे नमुने ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी बदलल्याचा आरोप झाला. आता हे बदलेले रक्ताचे नमुने आरोपीच्या आईचे असल्याची माहिती उघडकीस आली. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालची पत्नी शिवानीच्या रक्ताचे नमुने फेरफार करुन आरोपीच्या नावाखाली पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता आरोपीच्या आईच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत.

१९ मेच्या मध्यरात्री पोर्शे कारनं भरधाव वेगात दुचाकीला धडक दिली. स्थानिकांनी कारमधील सगळ्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी आरोपींना येरवडा पोलीस ठाण्यात नेलं. सकाळी त्यांना ससूनमध्ये रक्त चाचणीसाठी पाठवण्यात आलं. त्यावेळी अल्पवयीन मुलासोबत त्याची आई शिवानी अगरवाल होती. ससूनचे डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केली. हळनोरनं आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. आरोपी मद्यपान करुन कार चालवत असल्याचा आरोप होता. त्यामुळे रक्त चाचणीचा अहवाल महत्त्वाचा होता. आरोपीला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी नमुन्यांमध्ये फेरफार केली. त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचं रक्त आरोपीचं रक्त म्हणून तपासणीस पाठवलं. हे रक्त एका महिलेचं असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ती महिला कोण, असा प्रश्न निर्माण झाला. आरोपीला ससूनमध्ये चाचणीसाठी नेलं, त्यावेळी त्याच्यासोबत त्याची आई शिवानी होती. त्यामुळे ते रक्त शिवानी यांचं असल्याचा दाट संशय आहे. डॉक्टरांनी आरोपीचं म्हणून तपासणीसाठी पाठवलेलं रक्त त्याच्या आईचं होतं की अन्य कोणत्या बाईचं होतं, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
या प्रकरणात अगरवाल कुटुंबातील तीन पिढ्या अडचणीत आल्या आहेत. अल्पवयीन आरोपी बालसुधार आहे. त्याचा बाप विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल तुरुंगात आहे. त्यानंतर आता आरोपी मुलाची आई गोत्यात येण्याची शक्यता आहे. गरज भासल्यास मुलाच्या आईला चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.