वैभववाडीत दूध संकलन केंद्राचा शुभारंभ
वैभववाडी l प्रतिनिधी : शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे. दुग्धव्यवसाय मधून चांगले उत्पादन मिळू शकते. गोकुळ दूध संघाच्या विविध योजनांचा पुरेपूर लाभ घेऊन शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय वाढविला पाहिजे. व आर्थिक उन्नती साधली पाहिजे. असे प्रतिपादन वैभववाडी तालुका आत्मा समितीचे अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले.
वैभववाडी येथे माऊली दूध उत्पादन संघाच्या दुध संकलन केंद्राचा शुभारंभ जयेंद्र रावराणे यांच्या शुभहस्ते पार पडला. रावराणे म्हणाले, ग्रामीण भागात शेती पुरक व्यवसाय वाढले पाहिजेत. शहरात माऊली दुध उत्पादक संघ शेतकऱ्यांसाठी दिवसरात्र काम करेल. जास्तीत जास्त स्थानिक दुध उत्पादक शेतकऱ्यांनी माऊली दुध उत्पादक संघाकडे दुध संकलित करावे.
दुध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळ दूध संघाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन चेअरमन राजेश पडवळ यांनी यावेळी दिले.
वैभववाडी तालुक्यात सहकार रुजण्यासह अधिक वृद्धींगत होताना येथील शेतकऱ्यांच्या हाताला दाम मिळवून देण्याच्या उद्देशाने गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून वैभववाडी शहरात माऊली दुध उत्पादक सहकारी संस्थेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळसिदास रावराणे यांनी उद्घाटनप्रसंगी काढले. उद्धघाटन प्रसंगी उपस्थित दुध उत्पादक सभासदांना गोकुळ दूध महासंघा बद्दल अनिल सिकरे व राजेश गावकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी माऊली दुध उत्पादक संघ चेअरमन राजेश पडवळ, व्हा.चेअरमन सदानंद माईणकर, सचिव मंदार चोरगे, दुध उत्पादक शेतकरी नारायण मांजरेकर, चंद्रकांत अम्रसकर, पंडित रावराणे, सुरेंद्र रावराणे, संदिप पांचाळ, परेश सावंत, सदानंद सुतार, संतोष रावराणे, अक्षय गुरव, शुभम माळकर, राघोबा नारकर, राजेश सरवणकर, प्रथमेश पडवळ आदी दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.











