दोडामार्ग | प्रविण परब : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण शनिवारी शिवसेना पदाधिकारी यांनी येथील पिंपळेश्वर चौकात केले. ही रुग्णवाहिका जरी शिवसेना लोकार्पण करत असली तरी संपूर्ण तालुक्यातील रुग्णसेवेसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांनी दिली.
दोडामार्ग तालुक्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून त्यासाठी पाठपुरावा सुरू होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे.
सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण तालुकाध्यक्ष गणेशाप्रसाद गवस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, माजी सभापती राजेंद्र निंबाळकर, रामदास मेस्त्री, योगेश महाले, शैलेश दळवी, गोपाळ गवस, तीलकांचन गवस, संजय गवस, भगवान गवस, उदय मयेकर, मायकल लोबो, अनिल शेटकर, प्रवीण गवस, चेतना गडेकर, राधिका गडेकर, सौ. नाईक, अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.












