कीर्ती मुंढे वआर्यन बाईत चालेल नासा इस्रोच्या भेटीला

जिल्हा परिषद रत्नागिरी चा विशेष उपक्रम

रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत “जाणू विज्ञान ,अनुभवू विज्ञान” उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातून चाळणी परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखत नुकतीच पार पडली. या मुलाखतीसाठी जि.प.पु.प्रा.आदर्श शाळा असगणी नं.२,ता.खेड या शाळेतील विद्यार्थिनी कु.कीर्ती केशव मुंढे, कु.आर्यन दीपक बाईत व कु.आर्यन रविंद्र धाडवे हे तीन विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी कु.कीर्ती केशवमुंढे हिची अमेरिकेतील नासा या अवकाश संशोधन संस्थेला तर कु.आर्यन दीपक बाईत या विद्यार्थ्याची तामिळनाडू येथील भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो या संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाली असून या यशाबद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सदर उपक्रमांतर्गत केंद्रस्तरीय चाळणी परीक्षेसाठी संपूर्ण तालुक्यातील इयत्ता पाचवी ते सातवीचे जवळपास अडीच हजार विद्यार्थी व तालुकास्तरीय चाळणी परीक्षेसाठी तालुक्यातील एकशे पंचाऐंशी तर जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखतीकारिता जिल्ह्यातील नव्वद विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.या सर्वच कसोटीतून हे दोन्ही विद्यार्थी पात्र ठरले असून, कु.कीर्ती मुंढे हिची निवड गेल्यावर्षी इस्रो भेटीसाठी झाली होती आणि या वर्षी पुन्हा तिची निवड नासा भेटीसाठी झाल्याने तिचे विशेष कौतुक होत आहे.

आजच्या काळात अनेक पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे असल्याचे आणि मराठी शाळांना कनिष्ठ दर्जाचे मानल्याचे आपल्याला दिसून येते मात्र त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याच्या या यशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.येत्या काही दिवसातच रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा हा चमू मार्गदर्शक शिक्षक व अधिकारी यांच्या समवेत नासा व इस्रो भेटीसाठी रवाना होणार असून अनेकांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.भाग्यश्री आंब्रे ,पदवीधर शिक्षिका सौ.संजीवनी चव्हाण,शिक्षक श्री.केशव मुंढे ,श्री.भीमराज तांबे,पदवीधर शिक्षक श्री.विनायक पडवळ माजी मुख्याध्यापक श्री.सुनील चव्हाण तसेच उपशिक्षिका सौ.अस्मिता तुळसणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

शाळेच्या या उत्तुंग यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.श्रीधर शिगवण साहेब,केंद्र प्रमुख श्री.दिलीप देसाई सर ,तसेच गावच्या सरपंच मा.सौ. संजना बुरटे ,शाळाव्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मा.श्री.सुनील धाडवे तसेच सर्व सदस्य ,माता पालक संघ सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ व पालक यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.