..तर अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात कायदा हातात घेणार

मालवण येथे पारंपरिक मच्छिमारांनी मांडली भूमिका

मालवण | प्रतिनिधी : अनधिकृत पर्ससीन नौकांद्वारे होणाऱ्या मासेमारीमुळे पारंपारिक मच्छिमारांच्या रोजीरोटी हिरवाली जात आहे. अनधिकृत पर्ससीन नौकांवर करावाई करण्यासाठी कायदा असतानाही मत्स्य विभाग कारवाई करत नसल्यामुळेच आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागत आहे. यापुढे समुद्रात अनधिकृत पर्ससीन नौका मासेमारी करताना मत्स्य विभाग कारवाई करण्यात अपयशी ठरल्यास पारंपारिक मच्छिमार कायदा हातात घेऊ, असा इशारा मालवण येथील पारंपारिक मच्छिमारांनी दिला आहे. अनधिकृत पर्ससीन वरील कारवाईचा प्रश्न शासनाकडून न सुटल्यास २०२४ पासून निवडणुकीवर बहिष्कार घालू असा संतप्त इशाराही मच्छिमारांनी दिला आहे.

मालवण दांडी येथील श्रीकृष्ण मंदिरात पारंपारिक मच्छिमारांची पत्रकार परिषद घेतली. यावेळी मिथुन मालंडकर, बाबी जोगी, सन्मेष परब, भाऊ मोर्जे, महेश कोयंडे, भूषण जुवाटकर यांसह इतर बहुसंख्य मच्छिमार उपस्थित होते.

यावेळी मिथुन मालंडकर म्हणाले, पर्ससीन मच्छिमारांनी आपण केंद्र शासनाच्या सागरी हद्दीत मासेमारी करतो, तसेच बंदरात उभ्या असलेल्या पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाची कारवाई चुकीची आहे, असे म्हटले होते. मात्र, केंद्राच्या सागरी हद्दीत मासेमारी करण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे का ? तसेच पर्ससीन मच्छिमार कायद्यातील अटी शर्ती व नियमांचे पालन करतात का ? अनेक पर्ससीन नौकांची नोंदणी नाही, मासेमारी परवाना नाही, तसेच बंदरात असलेल्या पर्ससीन नौकांकडेही परवाना नाही, पर्ससीन जाळ्याच्या आस नियमानुसार नाहीत, अनेक नौका मोजमाप मध्ये बसत नाहीत, नौकांवरील परप्रांतीय व नेपाळी खलाशांची नोंद, अशा अनेक बाबी असून नियमात मासेमारी करतो असे कोणत्या आधारे पर्ससीन मच्छिमार म्हणत आहेत ? असा सवाल मिथुन मालंडकर यांनी व्यक्त केला.

मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पर्ससीन मासेमारी होत असताना कारवाई न करण्यासाठी मत्स्य विभागावर दबाव आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्ससीन विरोधातील संघर्षामुळे मच्छिमार कुटुंबातील महिला वर्गाचीही फरफट होत आहे. म्हणूनच काल महिलांनी मत्स्य विभाग कार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला. पर्ससीन विरोधात मालवणात सुरु असलेले हे आंदोलन यापुढे वेंगुर्ला व देवगड तालुक्यातही पसरणार आहे, असेही मालंडकर म्हणाले. राज्याच्या सागरी हद्दी बाहेर केंद्र शासनाच्या सागरी हद्दीत मासेमारी करतो असे पर्ससीन मच्छिमार म्हणत असतील तर त्यांच्या नौका मासेमारी करताना आम्हाला किनाऱ्यावरून दिसतात कशा ? असा सवाल महेश कोयंडे यांनी केला.