रत्नागिरी ः प्रतिनिधी : जेएसडब्ल्यू कंपनीत नोकरी मिळेल या आशेने तरुणाने आपल्याकडीलच साडे चार लाख गमावले.ही धटना 4 ऑक्टोबर 2023 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत रनपार येथे घडली आहे.याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित मिश्रा, महेंद्र तिवारी आणि कंपनीचा एच.आर (पूर्ण नाव गाव माहित नाही) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्या विरोधात अभिषेक विरेंद्र सुर्वे (21,रा.रनपार,रत्नागिरी) याने पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार, अभिषेकने नोकरीच्या शोधाकरता मोबाईलवर इंन्डिड जॉब सर्च अॅप डाउनलोड केले होते.4 ऑक्टोबर रोजी त्याने अॅप ओपन करुन पाहिले असता त्याला त्यावर जेएसडब्ल्यू कंपनी डोलवी पेण जि.रायगड येथे नोकर भरतीची जाहिरात दिसली.त्याने ऑनलाईन बेसिक फॉर्म भरुन कंपनीला पाठवला.
त्यानंतर अमित मिश्राने अभिषेकला फोन करुन कंपनीचे इन्स्टूमेंट मेन्टनंस डिपार्टमेंट आपल्याकडे आहे,त्यामुळे नोकरी पाहिजे असेल तर दोन पगार एच.आरला द्यावे लागतील असे अभिषेकला सांगितले.ही बाब अभिषेकने मान्य केल्यावर अमितने त्याला एका बँकेचा खाते नंबर दिल्यावर अभिषेकने त्यावर 4 लाख 56 हजार 225 रुपये भरले.दरम्यान,अभिषेकने त्याचा मित्र निकेत पाटील मार्फत जेएसडब्लयू कंपनी डोलवी पेण जि.रायगड येथे संपर्क साधला असता ती जाहिरात बोगस असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अभिषेकने पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.याप्रकरणी तीन संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 420,34 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












