राजहंस मागासवर्गीय नागरी पतसंस्थेचे १९ नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे उद्घाटन

 

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती स्थानिक- चिपळूण व मुंबई यांच्या पुढाकाराने संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने निर्माण करण्यात आलेल्या “राजहंस मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण” या पतसंस्थेचे उद्घाटन रविवार दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चिपळूणतील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात आयोजित करण्यात आले आहे. या पतसंस्थेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते होणार आहे.

राजहंस मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था चिपळूण) सुशांत घोलप उपस्थित राहणार असून, प्रमुख उपस्थिती माजी आमदार रमेश कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती मनोहर मोहिते, चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ पूजा निकम, पंचायत समिती माजी सभापती सुरेश खापले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) मुंबई प्रदेश जनरल सेक्रेटरी विवेक पवार, राजहंस पतसंस्थेचे चेअरमन व हितसंरक्षक समिती मुंबई मुख्य कमिटीचे सरचिटणीस हरिश्चंद्र पवार, राजहंस पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन जगदीश कांबळे, हितसंरक्षक समितीचे चिटणीस सुहास पवार, लेखा परीक्षक मधुकर मोहिते यांच्यासह संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, विभाग पदाधिकारी कार्यकर्ते, पतसंस्थेचे संचालक आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष विठोबा पवार तर स्वागताध्यक्षस्थान संस्थेचे स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत सावंत भूषवणार आहेत. राजहंस मागासवर्गीय नागरिक पतसंस्था निर्माण करण्यासाठी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन ही संस्था आकाराला आणली आहे. या पतसंस्थेच्या वतीने विविध आर्थिक विकासाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. तरी या उद्घाटन सोहळ्यास तालुक्यातील जनतेने व पतसंस्थेच्या सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचे सरचिटणीस हरिश्चंद्र पवार व सुहास पवार यांनी केले आहे.