चिपळूणवासियांना विश्वचषक अंतिम सामना पाहता येणार मोठ्या स्क्रीनवर

शिवसेनेकडून पवन तलाव मैदानावर थेट प्रक्षेपण

चिपळूण (प्रतिनिधी) : क्रिकेट विश्वचषकाचा महासंग्राम सध्या सुरू आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रविवार दि. १९ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होत आहे. देशासह संपूर्ण जगाचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. हा अंतिम सामना चिपळूणवासियांना मोठ्या स्क्रीनवर पाहाता यावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने शहरातील ऐतिहासिक पवन तलाव मैदानावर रविवारी दुपारी एक ते रात्री दहा या वेळेत मोठा स्क्रीन लावून क्रीडा रसिकांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण घडवले जाणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सन २०११ नंतर भारतीय संघ पुन्हा एकदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. यंदा भारताचे अन्य संघांबरोबर दहा सामने झाले. आजवर भारताने सलग दहा विजय प्राप्त केले आहेत. आता भारत क्रिकेट विश्वचषकापासून केवळ एक पाऊल दूर आहे. क्रिकेट विश्वचषक भारतीय संघ उंचावतानाचा हा क्षण चिपळूणसह परिसरातील क्रिकेटप्रेमींना अनुभवता यावा, यासाठी शिंदे गट शिवसेनेच्या वतीने ऐतिहासिक पवन तलाव मैदानावर स्क्रीन लावून याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. जिल्ह्यातील नामवंत खेळाडू, क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, क्रिकेटपटू, प्रसिद्ध समालोचक यांना यावेळी निमंत्रित करण्यात आले आहे, पुण्याहून खास मोठी स्क्रीन मागविण्यात आली आहे, असेही श्री. सकपाळ म्हणाले. चिपळूणमधील लहानांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्व क्रिकेट प्रेमी यांनी सामना मोठ्या स्क्रीनवर अनुभवण्यासाठी उपस्थित रहावे, भारताने विश्वचषक उंचावल्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे त्याचा आनंद आपण सर्वांनी साजरा करूया, असे शिवसेना नेते उमेश सकपाळ यांनी आवाहन केले आहे.
चौकट-
राष्ट्रवादीकडूनही स्क्रीन
या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण राष्ट्रवादीच्यावतीनेही भव्य स्क्रीनवर केले जाणार आहे. आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून रविवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणात हे प्रक्षेपण दुपारपासून केले जाईल, असे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कांपडी यांनी सांगितले.