खेड-दापोलीनाका परिसरातील फुटलेल्या जलवाहिनीची दुरूस्ती

खेड (प्रतिनिधी) खेड शहरातील दापोलीनाका परिसरातील सुर्वे इंजिनिअरिंगनजीक फुटलेल्या मुख्य जलवाहिनीची दुरूस्ती करण्यास नगर प्रशासनाला अखेर सवड मिळाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून होणारा लाखो लिटर पाण्याचा अपव्यय थांबला आहे. यामुळे रहिवाशांना भेडसावणारी कमी दाबाची समस्या काही अंशी दूर झाली आहे.

दापोलीनाका परिसरातील सुर्वे इंजिनिअरनजीक मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असतानाही नगर प्रशासनाने दुरूस्तीसाठी पुढाकारच घेतला नव्हता. पाण्याच्या होणाऱ्या अपव्ययाबाबत नागरिकांनी नगर प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी करून देखील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दादच दिली नव्हती. अखेर संतप्त रहिवाशांनी नगर प्रशासनावर हंडामोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.

याबाबत ची दखल घेत नगर प्रशासनाने अखेर जलवाहिनीची दुरूस्ती करण्यासाठी पावले उचलली. शर्थीच्या प्रयत्नानंतर जलवाहिनीची दुरूस्ती होवून पाण्याचा अपव्यय थांबला आहे. यामुळे कमी दाबाची पाणीसमस्याही दूर झाली असून नागरिकांनी सुटकेचा
निःश्वास टाकला