दोडामार्ग | सुहास देसाई
तालुक्यातील तीन ग्रामपंचायत उपसरपंचनिवडीत साटेली-भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुमन गणपत डिंगणेकर, कुडासे खुर्द (पाल पुनर्वसन) उपसरपंचपदी राजेंद्र दशरथ गवस हे बिनविरोध निवडून आले. तर बोडण (शिरंगे पुनर्वसन) उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत संजय शंकर गवस हे निवडून आले. या तिन्ही ग्रामपंचायतीत ग्राम विकास आघाडीचे उपसरपंच विराजमान झाले आहे.
दोडामार्ग तालुक्यातील या तिन्ही ग्रामपंचायतीची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. साटेली-भेडशी प्रभाग क्रमांक दोन मधून सुमन डिंगणेकर, कुडासे खुर्द प्रभाग दोन मधून राजेंद्र गवस व बोडण ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोन मधून संजय गवस हे सदस्य पदी बिनविरोध निवडून आले होते. या तिन्ही ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. यावेळी साटेली-भेडशी उपसरपंच पदी सुमन डिंगणेकर तर कुडासे खुर्द उपसरपंच पदी राजेंद्र गवस यांची बिनविरोध निवड झाली.
मात्र बोडण उपसरपंचपदी संजय गवस व वैशाली विश्वनाथ घाडी यांच्यात लढत झाली. यावेळी संजय गवस यांना पाच मते तर वैशाली घाडी यांनी तीन मते मिळाली. संजय गवस विजयी झाल्याने उपसरपंचपदी त्यांची निवड झाली. नूतन उपसरपंचांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी यापूर्वी दावे केले होते माञ आज निवडीतही ग्रामविकास पॅनल दिसून आले आहे.









