संतोष वायंगणकर
अरे, काय चलला हा अशी सुरूवात करीत मोबाईलवर असंख्य विषयांवर चर्चा करीत कधी अस्खलित मालवणी शिव्यामध्येच कुणाच्याही बोलण्यातून न ऐकलेले शब्द असं हे साक्षात सरस्वतीच तांडव फक्त विनायक धाकु मिठबावकर नावाचा पत्रकार, साहित्यिक करतो. फटकळ पण तितकाच एक प्रेमळ माणूस समोरून बोलतो आणि आपण मात्र फक्त ऐकतो. हा असा संवाद पूर्वी जवळपास नेहमीचाच असंख्यवेळा प्रत्यक्ष भेटीत मग ते भेटीचे ठिकाण कोणतेही असू शकते. कणकवली, कुडाळ, देवगड एस.टी. बसस्थानक असेल किंवा कुठेही असलात तरीही विनायक मिठबावकर यांच्या बोलण्याला सबकुछ माफ. समोरच्याने फक्त सगळ काही हसत स्विकारायचे आहे. कारण मिठबावकर यांच्यासमोर कोणी कधी रागावल्याचे मी ऐकल नाही. जुळवुन घेणं हा मिठबावकरांचा स्वभावच नाही. जे वाटलं, पटलं तेच स्पष्टपणे कधी फटकळपणे बोलून मोकळ होणं हा विनायक मिठबावकर यांचा स्वभाव झाला. आज विनायक मिठबावकर यांच्या वयाने ७५ वर्षे पूर्ण केली आहेत.

दलित चळवळीत काम करणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता असलेल्या विनायक मिठबावकर यांचा जीवन संघर्षही फार प्रतिकुलतेत राहिला. त्यांच्यातला चळवळीतला कार्यकर्ता नेहमीच जिवंत राहिला. त्यांना जे पटलं आणि नाही पटलं त्यासंबंधी व्यक्त होणं हा त्यांचा स्वभाव राहिला. आचार्य प्र.के.अत्रे यांच्यासोबत मराठामध्ये काम केलेले श्री. मिठबावकर म्हणूनच पत्रकारीता करतानाही परखडपणे लिहीत राहिले. जे अन्यायकारक वाटलं त्यावर अतिशय स्पष्टपणे मत मांडत राहिले. मुंबईत असताना काहीकाळ ज्येष्ठ पत्रकार शिवनेरकार विश्वनाथ वाबळे यांच्या सोबतही विनायक मिठबावकर यांनी शिवनेरमध्ये पत्रकारीता केली आहे. त्यानंतर त्यांनी अखंड रत्नागिरी जिल्हा असाना जिल्हा परिषदेतही सदस्य म्हणून काम केले आहे. माजी मुख्यमंत्री स्व.बॅ. ए.आर.अंतुले, स्व.अॅड. एस.एन.देसाई, माजी खा. स्व.हुसेन दलवाई अशा पूर्व पिढीच्या काँग्रेसी राजकारण्यांशी श्री. मिठबावकर यांच्याशी ऋणानुबंध राहिलेले आहेत.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशीही विनायक मिठबावकर यांचे निकटचे संबंध राहिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे एक अभ्यासू सदस्य म्हणून विनायक मिठबावकर यांनी अतिशय चांगले काम केले आहे. विनायक मिठबावकर यांचे संधीकाळ ही कॅन्सर रूग्णावर आधारित कादंबरी फारच गाजली. श्री. मिठबावकर यांनी या लेखनात वैद्यकशास्त्रावर आधारितच भाष्य केले आहे. काहीकाळ साप्ताहिक उधाणलाटा हे साप्ताहिक चालविले. उधाणलाटामाधून अग्रलेखांची मांडणी करताना अतिशय परखडपणे त्यांनी मत मांडली. परखडपणे लिहित असताना त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांची मांडणी केली. अनेक समस्या त्यांनी साप्ताहिक उधाणलाटामध्ये मांडल्या. दलाई लामा यांच्या कणकवलीतील जाहिर परिषदेच्यावेळी त्यांच्यावर साप्ताहिक उधाणलाटाचा विशेषांक विनायक मिठबावकर यांनी काढला होता. हा विशेषांक आजही सर्वांच्या स्मरणात आहे. फिरस्ते असणाऱ्या विनायक मिठबावकर यांना गेल्याकाही वर्षातील आजारपणाने फिरस्ता येत नाही. मात्र, तरीही तोच आवाज, तोच फटकळपणा त्याच शिव्या आणि तिच शब्दप्रभूंची शब्दांची किमया श्री. मिठबावकरांच्या बोलण्यातून ऐकायला मिळते. आज त्यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. विनायक मिठबावकर यांना वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा… !
***












