देखभाल दुरूस्ती अभावी यंत्रणा कोलमडली
खेड(प्रतिनिधी) खेड शहरात कायदा व सुवव्यवस्था अबादीत राखण्यासोबतच गुन्हेगारांच्या हालचालींवर करडी नजर ठेवता यावी म्हणून पोलिस यंत्रणेने लोकसहभागातून उभारलेल्या नेत्रा या महत्वाकांक्षी प्रकल्पाला योग्य देखभाल दुरूस्ती अभावी घरघर लागली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख प्रवेश मार्गावर व गजबजलेल्या भागामध्ये भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असुन, गुन्हेगार उंदड होण्याची भिती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील एक संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या खेडमध्ये प्रगतीआड गुन्हेगार व असामाजिक तत्व येऊ नये या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञान वापरून मिशन नेत्रा प्रायोगिक तत्वावर वर्षभरापूर्वी राबविण्यात आले होते. जिल्ह्यातील शहराच्या विस्तारामुळे वाहतूक वाढत आहे. पोलिसांचे संख्याबळ कमी आणि दुसरीकडे वाढती गुन्हेगारी याला आळा घालण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील प्रमुख शहरात मिशन नेत्रांतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून गुन्हेगारीला आळा घालणे, संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणे, वाहतूक नियंत्रण व जनजीवन असामाजिक तत्वपासून सुरक्षित करण्याच्या उद्देशाने मिशन नेत्रा राबविण्यात आले होते.
खेड शहरातील सर्व महत्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याने खेड शहर ‘नेत्रा’च्या कक्षेत आल्याने अप्रिय घटनाना पायबंद बसणार होता. त्यामुळे समाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी या नेत्रा मिशन साठी सामाजिक सलोख्याने हात पुढे करत शासनाच्या या योजनेला पाठबळ दिले. दुबई येथील उद्योजक बशीर हजवानी यांनी हजवानी फाऊंडेशनच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. खेड मधील स्थानिक एका ठेकेदाराला ही यंत्रणा उभारण्याची व देखभालीची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु अल्पावधीतच ही यंत्रणा डबघाईस आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत लाखो रुपये खर्च करून देखील खेड शहर परिसरातील अनेक कॅमेरे बंद स्थितीत असुन, बसस्थानक, निवाचा चौक, गांधी चौक, तीन बत्ती नाका याठिकाणी बसवण्यात आलेली लाऊड स्पीकर यंत्रणा देखील धुळखात पडलेली आहे.
सुरवातीला या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून महिनाभर चांगली व्यवस्था लावण्यात येत होती. एकाच ठिकाणी एक पोलीस कर्मचारी बसून वाहतुक देखील सुरळीत करण्यात पोलिस यंत्रणेला यश येत होते. नेत्रा मिशन च्या अंतर्गत सुरवातीला उत्तम काम सुरू होते. पण काही महिन्यातच खेड येथे नेत्रा मिशन अंतर्गत बसविलेले कॅमेरे आणि लाऊड स्पिकर यंत्रणा ही धुळखात पडल्याचे दिसून येत आहे. या कॅमेऱ्यांच्या भवती पावसाळ्यात वेलींनी वेढा घातला आहे. तर अनेक ठिकाणी पावसात कॅमेरे भिजल्यामुळे बंदावस्थेत आहेत. तरी याकडे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी लक्ष देऊन तात्काळ ही यंत्रणा सुस्थितीत करावी अशी आग्रही मागणी खेड शहरावासियांकडून होत आहे.
यंत्रणा पुन्हा कायार्न्वित करू – भोयर
काही कॅमेरे बंद स्थितीत आहेत. ही सत्य परिस्थिती आहे. तरी यासंदर्भात ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे. त्यांच्याकडून आम्ही या यंत्रणेचा मेन्टेन्स करून घेऊ आणि मिशन नेत्रा अंतर्गत बसविलेले कॅमेरे, लाऊड स्पिकर ही यंत्रणा पुन्हा कायार्न्वित करू अशी प्रतिक्रीया खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी दिली.












