
खेड(प्रतिनिधी) खेड – भरणे हा राज्यमार्ग असुन, या राज्यमार्गावर भरणे ग्रामपंचायतीच्या आर्शिवादाने दुकाने थाटली जात आहेत. याप्रकरणी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी गंभीर दखल घेतली असुन, तातडीने कारवाई करणार असल्याचे सांगितले. तर मुंबई – गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे देखील अशाच पद्धतीने अनधिकृत बांधकामे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे या बांधकांमाना कुणाचा आर्शिवाद आहे. असा प्रश्न उपस्थित होत असुन, ग्रामपंचायतीकडे या संदर्भात विचारणा केली असता. त्यांनी सांगितले की, हायवे नजीकच्या बांधकामांवर कल्याण टोलवेज कंपनी आणि प्रांताधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
मुंबई – गोवा महामागार्लगत केंद्रसरकारने सव्हिर्स रोड व पावसाळी नाले उभारण्यासाठी संपादीत केलेल्या जमिनीवर गेल्या वर्षभरात अनेक पत्र्याचे खोके व दोन मजली इमारती उभारण्यात आल्या आहेत. परिणामी सव्हिर्स रोड अरुंद झाले असुन दररोज या ठिकाणी वाहतुक कोंडी व लहान मोठे अपघात होत आहेत.
भरणे उड्डाण पुला खालील अनधिकृत दुकाने खेड च्या जागरुक पोलिसांनी हटविली होती. परंतु गेल्या काही दिवसात पुलाखाली पुन्हा एकदा बिनदिक्कत पणे दुकाने उभारण्यास सुरवात झाली आहे. परंतु याबाबत राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम विभागाचे संमधीत जबाबदार अधिकारी व ठेकेदार पुणर्पणे दुलर्क्ष करित आहेत. बांधकामा मधून राज्य शासनाच्या तिजोरीत महसुल विभागामार्फत दररोज कोट्यावधी रुपयांचा महसुल गोळा होत असतो. परंतु अनधिकृत बांधकामे करून हा महसुल बुडवला जात असल्याने महसुल विभाग या अनधिकृत बांधकामे करणाऱ्या विरोधात काय कारवाई करते हे देखील पहावे लागणार आहे.
तसेच खेड – दापोली कडे जाण्यासाठी राज्यमार्ग खेड -भरणे असा अस्तित्वात आहे. या मार्गाचे भरणे ते अण्णाचा पर्या इथपर्यंतचा भाग भरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. या भागात रस्त्याच्या बाजूपट्टीवर – रस्त्यालगतच्या गटारावर व थेट रस्त्यावर काही जणांनी आपली दुकाने थाटून व्यावसाय सुरू केले आहेत. काही वर्षापूर्वी हा मार्ग अरुंद असल्याने सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. परंतु याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन काहींनी रस्त्याच्या बाजूला मोकळ्या झालेल्या जागेचा आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून वापर करण्यास सुरवात केली आहे. या रस्त्याच्या एका बाजूला कृषी विभागाची नर्सरी तर दुसर्या बाजूला अनेक बांधकाम साहित्य पुरवठा करणार्या व्यापार्यांची दुकाने आहेत. परिणामी या ठिकाणी अवजड वाहनांची सातत्याने वर्दळ सुरू असते.
मुंबई – गोवा महामार्गालगत जोडलेला खेड -दापोली कडे जाणारा हा रस्ता असुन, पर्यटक व अन्य प्रवासी वाहने या मार्गावरूनच ये-जा करतात. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये काही स्थानिक व परप्रांतिय व्यावसायिकांनी या ठिकाणी दुकाने थाटून आपले बस्तान मांडले आहे. धोकादायक पद्धतीने ही दुकाने थाटलेली असल्याने व त्याठिकाणी खरेदीसाठी येणार्या ग्राहकांची वाहने थांबत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या दुकानदारांना भरणे ग्रामपंचायतीकडून फिरत्या व्यावसायाच्या पावत्या फाडल्या जात असल्याची बाब निर्दशनास आली आहे.
भरणे – खेड रस्त्यालगत अनधिकृतरित्या व्यवसाय करणार्यांना आम्ही तातडीने हटवणार आहोत. त्यांना यापूर्वी अनेक वेळा सुचना केलेल्या आहेत. परंतु पुन्हा एकदा सुचना करून त्यांनी त्यांची दुकाने न हटविल्यास त्यांच्या सर्व व्यवसाय साहित्यासह इतर वस्तु जप्त करण्यात येतील व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रीया सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री.पावशे यांनी दिली.
—
हायवेच्या रस्त्यालगतची संपादीत जागा आम्ही राष्ट्रीय बांधकाम विभागाकडे वर्ग केलेली आहे. यापुढे या ठिकाणी अनधिकृत बांधकामावर कारवाई करावयाची आहे. ती राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. त्यांना या ठिकाणी लागणारे पोलिस सरंक्षणासह अन्य कायदेशीर बाबी साठी आम्ही मार्गदर्शन करू शकतो. अशी प्रतिक्रीया येथील प्रांताधिकारी सौ. राजश्री मोरे यांनी दिली.











