शिक्षकेतर कर्मचारी राज्य महामंडळ कोल्हापूर विभागीय सचिव पदी गजानन नानचे बिनविरोध निवड

दोडामार्ग | सुहास देसाई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाच्या कोल्हापूर विभाग सचिवपदी गजानन नानचे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील माध्यमिक ,उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या महामंडळाची सन २०२३-२०२६ या कालावधीसाठी साने गुरुजी स्मारक पटवर्धन हायस्कूल ,पुणे येथे निवडणूक प्रक्रिया पार पडली.

या निवडणूक प्रक्रियेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव गजानन द्वारकानाथ नानचे शिवाजी हायस्कूल पणदूर तिठा या प्रशालेचे लिपिक कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्याच्या विभागीय सचिव पदी निवडणूक रिंगणात होते. त्यांची कोल्हापूर विभागीय सचिव म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी अनिल माने सातारा तर राज्याच्या सरकार्यवाहपदी शिवाजी खांडेकर पुणे व इतर तेरा पदांची बिनविरोध निवड झाली व चार पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.

महाराष्ट्र राज्याच्या महामंडळाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यातून आठ मतदार असतात यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनिल राणे, वैभव केंकरे, प्रदीप सावंत, शाबी तुळसकर, निलेश पारकर, पंढरीनाथ आचरेकर, विजय गवस हे मतदार होते. तर त्या मतदारांची शिफारस करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष सुहास देसाई बळीराम सावंत, कृष्णा लोंढे,लाडू जाधव, गणेश देसाई उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्याचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजानन नानचे यांची कोल्हापूर विभाग सचिव पदी निवड झाल्याचे समजताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी वर्गामध्ये मोठा उत्साह पसरला आहे. तसेच त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय सचिव पद मिळाल्याने पाचही जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेला बळकटी मिळणार आहे.