परांजपे-मोतीवाले हायस्कूलमध्ये लेखक डॉ. शरद काळे यांचे व्याख्यान

 

चिपळूण (प्रतिनिधी) : भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथील वैज्ञानिक अधिकारी, लेखक डॉ. शरद काळे यांनी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या परांजपे-मोतीवाले हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केले.

या मार्गदर्शनपर व्याख्यानात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानात सामील करून घेत नाटिकेतून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे कार्य केले. सूक्ष्म जीवशास्त्रातून एमएस सीपर्यंत शिक्षण घेऊन कृषि विभागातही त्यांनी कार्य केले. कीटकनाशकाच जमिनीतील उपयोगी सूक्ष्म जीवावर आणि पर्यावरणावर परिणाम या विषयावर संशोधनपर प्रबंध सादर केला आहे.

४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी संशोधन कार्य केले. त्यांच्या या वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित ग्रंथालीने पुस्तके ही प्रकाशित केली आहेत. यावेळी मुख्याध्यापक भाऊ कांबळे यांनी वैज्ञानिक अधिकारी लेखक डॉ. शरद काळे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले. प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.