वीज दरवाढी विरोधात युवक काँग्रेसची महावितरणवर धडक

निषेध आंदोलनातून व्यक्त केला संताप

चिपळूण (प्रतिनिधी) : भरमसाठ वीज दरवाढीने होरपळलेल्या जनतेची व्यथा घेऊन बुधवारी थेट रस्त्यावर उतरलेल्या रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसने महावितरण कार्यालयावर धडक देत निषेध आंदोलन छेडले. हातात पक्षाचे झेंडे, विविध फलक आणि जोरदार घोषणांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहर दणाणून सोडले. अधिकाऱ्यांनाही यासंदर्भात जाब विचारण्यात आला. जिल्हा युवक काँग्रेसने बुधवारी सायंकाळी महावितरण कंपनीविरोधात निषेध आंदोलन छेडले.

शहरातील नगर पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या आंदोलनाला सुरूवात झाली. ‘नहीं भरेंगे, नहीं भरेंगे, महँगा बिजली बिल नहीं भरेंगे, जाहीर निषेध, जाहीर निषेध महावितरणचा जाहीर निषेध, इतर राज्यात सूट महाराष्ट्रात महावितरणची लूट’ अशा अनेक घोषणा देत पदाधिकाऱ्यांनी चिंचनाकामार्गे भोगाळे, मध्यवर्ती बसस्थानक ते मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधिकारी यांना वीज दरवाढ, वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा, वीज बिलांतील तफावत यांसारख्या मुद्यांवर जाब विचारला.

अजून किती दिवस आपण जनतेला अंधारात ठेवणार आहात. स्वतःचे खिसे भरण्यासाठी जनतेच्या खिशातून पैसे काढणाऱ्या या जुलूमशाही सरकारचा जाहीर निषेध असो, अशा शब्दात युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी संताप व्यक्त केला, तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहप्रभारी एहसान खान व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कोकण विभाग संघटक प्रमुख प्रभात झा, रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी हिसामुद्दीन खान, सचिव अरविंद तावडे, दापोली विधानसभा अध्यक्षा सुचिता सावंत यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.