गावखडी (वार्ताहर)रत्नागिरी तालुक्यात पुर्णगड हे गावखडी खाडीला जोडणारे अत्यंत महत्वाचे बंदर आहे. पूर्वी या खाडीतून गावडे आंबेरे गावखडी , डोर्ले ,साटवली या सर्व गावातील मोठे मचवे गलबते होडया या मार्गातून बंदरात येत. पुर्णगड ,गावखडी बंदराच्या दरम्यान प्रचंड गाळ साचला आहे. तसेच गाळ काढला जात नाही. गेल्या वर्षापासून मच्छीमारांना नौका नेण्यासाठी, आणण्यासाठी भरपुर ञास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे मच्छीमार हतबल झाले असून मेरी टाईम बोर्डाकडून मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केली आहे.
या खाडीतून ये -जा करण्यासाठी मच्छीमारांना भरती ओहोटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच पावसाळ्यात मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यावर भरती ओहोटीच्या वेळी नौकांचे अपघात ही झाले आहेत.
यात काही मच्छीमारांना आपला जीव ही गमवावा लागला आहे. पावसाळा नंतर हा प्रश्र सुटण्याची शक्यता होती परंतु हा प्रश्र सुटण्या ऐवजी अधिक जटिल होत चालला असल्याने समुद्रात येजा करण्याचा मार्गच बंद होण्याची शक्यता निर्माण झाली.











