शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त शृंगारतळी बाजारपेठेत फुले व फळे खरेदीसाठी गर्दी

 

शृंगारतळी (वार्ताहर) शृंगारतळी बाजारपेठेत शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवार निमित्त बुधवारी फळे व फुले खरेदीसाठी गर्दी झाली होती.
सध्या संत्री, मोसंबी, सफरचंद, द्राक्षे, केळी, पेरु, बोर अशा विविध फळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच गुलाब, लाल व पिवळा झेंडू आदी फुलांची आवकही भरपूर आहे. त्यामुळे ग्राहकांना आनंद लुटता आला.

 

मार्गशीर्ष गुरुवारी चौरंगावर तांदूळ पसरवून त्यावर पाणी भरलेला कलश ठेवला जातो. त्यावर आंब्याची पाने लावले जातात. त्यावर श्रीफळ ठेवून देवी समजून सजवली जाते. दागिने, फुलांची वेणी घातली जाते. यासाठी पाच प्रकारची फळे, पाच प्रकारच्या झाडांची पानेही लागतात. या देवीची पूजा केली जाते. देवीभोवती आरस मांडले जाते. या व्रताचे महत्त्व सांगणारी पुस्तिका पूजेमध्ये ठेवली जाते. पूजा झाल्यानंतर पुस्तिकेत दिलेले देवीची कथा याचे वाचन केले जाते या व्रतासाठी गोड नैवेद्य दाखवला जातो. शेवटचा गुरुवार असल्याने व्रताचे उद्यापन केले जाते. त्यामुळे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असल्याने बुधवारी शृंगारतळी बाजारपेठेत फळे व फुलांना मागणी वाढली होती.