मध्यरात्री १२ वाजताच महापरिनिर्वाण दिनानिमित्त उसळला भीमसागर
रत्नागिरी l प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने अनुयायी रत्नागिरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल झाले होते. मध्यरात्री १२ वाजताच रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा ( मीराताई आंबेडकर प्रणित) व बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी या दोन्ही संघटनांच्या वतीने आधुनिक भारताचे निर्माते, विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तान्हुल्यापासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील अनुयायांच्या पुतळ्यानजिक रांगा लागल्या होत्या. ५ डिसेंबरच्या रात्री ९ वाजल्यापासूनच गाव-वाड्यामधून अनुयायी रत्नागिरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दाखल होण्यास सुरुवात झाली होती. सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी रात्री ठीक १२ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण केले. तसेच दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंचशील ग्रहण करून दोन्ही संस्थांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. रत्नागिरीच्या दिशेने येणारे अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे समता सैनिक दलाचे सैनिक, चळवळीतील कार्यकर्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते पुतळा परिसराच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे हजारो अनुयायी पोलिसांना सहकार्य करताना पाहायला मिळाले.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास नियोजनानुसार विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, धम्म बांधव अभिवादन करण्यासाठी दाखल होतात. जवळपास एक ते दोन तास शिस्तबध्द पध्दतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रत्नागिरी येथे दाखल होणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता धम्म बांधवांना दर्शन घेणे सुकर होण्यासाठी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पोलिसांना उत्तम सहकार्य केले.
हा अभिवादन कार्यक्रम संयुक्त उत्सव कमिटीचे अध्यक्ष सामाजिक चळवळीतील धडाडीचे नेतृत्व अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी संयुक्त समितीचे सेक्रेटरी व्ही. बी. मोहिते, तुषार पवार, सुहास कांबळे, नरेंद्र आयरे, मंगेश सावंत, विजय आयरे, शिवराज जाधव, रविकांत पवार, दिनकर कांबळे, अनंत जाधव (भा. बौ. म. जिल्हाध्यक्ष), विलास कांबळे, प्रीतम आयरे आदी उपस्थित होते.
समता सैनिक दलाची सलामी
भारतीय बौद्ध महासभाप्रणीत समता सैनिक दलाच्या तुकडीने पुतळा परिसरात संचलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सलामी दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांसोबत समता सैनिक दलाचे सैनिक ही कार्यरत असतात. दीक्षाभूमी, चैत्यभूमी अशा महत्वाच्या ठिकाणी होणाऱ्या सोहळ्यात समता सैनिक दलाचे कार्यकर्ते निळ्या टोपीत नेहमीच दिसतात. परंतु, गेल्या कित्येक वर्षांत निळ्या टोपीतील हजारोच्या संख्येने एकाचवेळी दिसणारे भीमसैनिक दुर्लभ झाले होते. मात्र काही वर्षांपासून जिल्ह्यात निळ्या टोपीतील समता सैनिक दलाचे भीमसैनिक अनेक कार्यक्रमात दिसून येतात. हे सैनिक मोठ्या संख्येत लक्ष वेधून घेत असतात.
मिलिंद युवा मंडळाकडून चहाची सोय
दरवर्षी गाव-खेड्यातून धम्म बांधव हजारोंच्या संख्येने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी रत्नागिरीत येत असतात. येणाऱ्या धम्म बांधवांना तोणदे येथील मिलिंद युवा मंडळाकडून चहाची सोय करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व अनुयायांना बौध्दजन पंचायत समिती शाखा व मिलिंद युवा मंडळ तोणदे यांनी मोफत चहा पुरविल्याने दोन्ही संस्थांच्यावतीने तोणदे शाखेला धन्यवाद दिले.











