रत्नागिरी : येथील जीजीपीएस मधील काही बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाची पाचवी ते नववीच्या वर्गांची मातृभूमी परिचय शिबिरे उत्साहात पार पडली. विविध ठिकाणी ही निवासी शिबिरे घेण्यात आली. पाचवीचे शिबिर गणपतीपुळे येथे, सहावीचे शिबिर राजापूर, सातवीचे शिबिर चिपळूण येथे, आठवीचे देवगड येथे अशी शिबिरे घेण्यात आली. नववीच्या विद्यार्थ्यांचे चार गट करून त्यांना या सर्व शिबिरांमध्ये विभागले जाते.
ही मुले स्वयंसेवक म्हणून व्यवस्थापनात भाग घेतात. या शिबिरांचा उद्देश मुलांना स्वयंशिस्त लागणे, घरापासून, आई-वडिलांपासून दूर राहून स्वतःची कामे स्वतः करणे, एकमेकांना मदत करणे, शिबिराच्या ठिकाणी असलेली ऐतिहासिक ठिकाणे, शैक्षणिक स्थळे यांना भेटी देणे असा असतो. शिबिराच्या ठिकाणी तज्ञ लोकांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जातात. अशा प्रकारे ही शिबिरे दरवर्षी मजा, मस्ती, अभ्यास, पर्यटन आणि गोष्टींनी संपन्न होतात.
गुरुकुल शिक्षण पद्धती ही अन्नमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, आनंदमय कोश, मनोमय कोश या पाच कोशांवर आधारित असते. या प्रकारची शिबिरे हि या कोशांच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त असतात. शिबिरांच्या यशस्वीतेमध्ये शिक्षकांचे व पालकांचे सहकार्य मोलाचे ठरते. शिबिरे यशस्वी होण्यासाठी गुरुकुल प्रमुख नितीन लिमये, गुरुकुलचे सर्व शिक्षक, शाळेच्या मुख्याध्यापिका, तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.












