कपडे, धान्य, दागिने पैसे जळून खाक; ग्रामस्थांनी विझवली आग; मोठा अनर्थ टळला
मंडणगड :तालुक्यातील दंडनगरी येथील एक घर अचानक लागलेल्या आगीत छप्पर जळून खाक झाले. ही आग ता.६ डिसेंबर रोजी लागली. यामध्ये घरातील धान्य, पैसे, दागिने, कपडे जळून गेले. आगीची बातमी कळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवली. मात्र तोपर्यंत घराचे लाकडी छप्पर व माळ्यावर ठेवलेले सर्व साहित्य जळून गेले.
दंडनगरी येथील परेश धोंडू शेळके व कुटुंब कामानिमित्त मुंबईत असल्याने हे घर बंद होते. घरातून अचानक आगीचे लोळ बाहेर येवू लागले, काही वेळातच घराच्या लाकडी छप्पराने पेट घेत पूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. गावातील ग्रामस्थ तसेच कोंडगाव मोहल्ल्यातील ग्रामस्थ यांनी बातमी कळताच घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र तोपर्यंत घराचे छप्पर व माळ्यावर ठेवलेले धान्य, कपडे, दागदागिने व पैसे जळून गेले होते. घराच्या भिंती फक्त शिल्लक राहिल्या आहेत. घडलेल्या घटनेत किती नुकसान झाले हे पंचनामा झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली याची स्पष्टता झाली नाही. तालुक्यात ही बातमी पसरताच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष गोवळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रघुनाथ पोस्टूरे, युवा सेनेचे गणेश बिल्लार, विश्वनाथ टक्के, अभय पिचूर्ले यांनी दंडनगरी येथे घटनास्थळी भेट दिली.












