गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी : गेळे येथील प्रकार 

आंबोली । प्रतिनिधी : शेतातून घरी परतत असताना वाटत रस्त्यात उभ्या असलेल्या गव्याने हल्ला केल्यामुळे दुचाकीवरील शेतकरी गटारात फेकले गेल्यामुळे गंभीर जखमी झाले. त्या दोघांनाही प्राथमिक उपचारानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारार्थ पाठविण्यात आले. या प्रकारामुळे वेळे परिसरात घबराट निर्माण झाले असून वनविभागाने या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेळे येथील शेतकरी दीपक गवस, प्रमोद गावडे व लक्ष्मण गावडे हे आपल्या दुचाकींवरून परतत गेळे गावातील बाळे भाटलेवाडी या ठिकाणी ऊस शेतीतून परत येत असताना वाटेत रस्त्यात उभा असलेल्या रानगव्याने चाल करत त्यांच्या अंगावर गेला. यावेळी एका दुचाकीला गव्याने ठोकर दिल्याने प्रमोद गावडे व दीपक गवस हे गटाराच्या दिशेने फेकले गेले. त्यामुळे त्यांना दुखापत झाली.

यावेळी आरडाओरड केल्याने तो गवा तेथून पळून गेला. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. या प्रकाराची माहिती मिळताच आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी जखमींना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. गुरुवारी सायंकाळी उशिरा हा प्रकार घडला.

त्यानंतर वनक्षेत्रपाल विद्या घोडके व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या बाबत अधिक तपास आंबोली वनविभागाचे कर्मचारी करत आहेत.

आंबोली ऊस शेती परिसरामध्ये हत्तीनंतर आता गव्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. हे शेतकऱ्यांचे नुकसान कोण देणार हा सवाल त्यांनी उपस्थित केला असून या गवारेड्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनात्मक पवित्र घेऊ असा इशाराही स्थानिक शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.