राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील रायपाटण ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. यावेळी सरपंच पदासाठी निलेश चांदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
रायपाटण ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता असुन एकुण नऊ सदस्यांमध्ये आठ सदस्य भाजपचे तर एक सदस्य शिवसेनेचा आहे. त्यापैकी एका सदस्याचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे. ठरावा नुसार अडीच वर्षे सरपंचपदाची विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार पहिली संधी महेंद्र गांगण यांना मिळाली होती. महेंद्र गांगण यांनी आपला कार्यकाल पुर्ण होताच सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर सरपंचपदाच्या रिक्त पदासाठी मंगळवारी निवडणुक घेण्यात आली. राजापूर नायब तहसीलदार सौ. दिपाली पंडीत यानी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहीले. सरपंचपद हे खुल्या प्रवर्गातील असुन त्यासाठी प्रभाग क्रमांक दोनमधील सदस्य निलेश शांताराम चांदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सरपंचपदासाठी श्री.चांदे यांच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रायपाटणच्या सरपंचपदी निलेश राणे यांची बिनविरोध निवड झाली अशी घोषणा निवडणूक अधिकारी दिपाली पंडीत यांनी केली. नुतन सरपंच निलेश चांदे यांचे तालुका भाजपचे अध्यक्ष भास्कर सुतार यासह पक्षाचे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले.












