वाळू व्यावसायिक जोमात, महसूल विभाग कोमात,
पुरातन अवशेष नष्ट होण्याचा धोका
खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बहिरवली दिवा बेट येथे संक्शन पंपाच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून चोरट्या पद्धतीने वाळू उपसा सुरू आहे. मात्र याबाबत महसूल विभागाने बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
खेड व चिपळूण तालुक्याच्या हद्दीत असणाऱ्या बहिरवली दिवा बेट येथे सायंकाळपासून पहाटेपर्यंत संक्शन पंपाची घरघर सुरू होते. या संक्शन पंपाद्वारे ८० ते ९० ब्रास वाळूचे उत्खनन केले जात असतानाही ही बाब महसूलच्या निदर्शनास येत नसल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
याठिकाणी राजरोसपणे केल्या जाणाऱ्या वाळू उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत असतानाही
महसूल विभागाने हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवत बघ्याचीच भूमिका घेतली आहे. चार दिवसांपूर्वीच कोरेगाव फाट्यापासून काही अंतरावर वाळू वाहतुकीचे डम्पर पोलिसांकडून अडवण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर कोणती कारवाई केली, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
बहिरवली दिवा बेट येथे पुरातन अवशेष आढळले असून पुरातत्त्व विभाग संशोधनही करत आहे. यामुळे दिवा बेट पर्यटनाच्या पटलावर आला आहे. याचठिकाणी मात्र बेकायदेशीरपणे संक्शन पंपाद्वारे सुरू असलेल्या वाळू उपशामुळे दिवा बेट येथील पुरातन अवशेष नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तर कारवाई करणार सुधीर सोनावणे, तहसीलदार- खेड
बहिरवली दिवा बेट येथे संक्शन पंप लावून केला जाणारा वाळू उपसा नेमका कोणाच्या हद्दीत येतो, हे तपासावे लागेल. तालुक्याच्या हद्दीत वाळू उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आल्यास रितसर कारवाई करण्यात येईल.











