मंडणगड : प्रतिनिधी : तालुक्याचे दहा प्रमुख समस्यांशी निगडीत मागण्या पुर्ण करण्यासाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) तालुका शाखेचेवतीने 12 डिसेंबर 2023 रोजी राज्यांचे मुख्यमंत्र्याकरिता मंडणगड तहसिल कार्यालयाचे माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले असून या मागण्या मान्य न झाल्या 1 जानेवारी 2024 रोजी म्हाप्रळ येथे धरणे आंदोलन कऱण्याचा इशारा देण्यात आला आहे. तहसिलदार तानाजी शेजाळ यांची भेट घेऊन त्यांचेकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत म्हाप्रळ पुलाचे शेजारी नवीन पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.
बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडणगड मुंबई या संस्थेचा रत्नागिरी जिल्ह्याचे सरहद्दीवर मौजे म्हाप्रळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व नावासह प्रवेशद्वार आणि पर्यटकांसाठी निवासस्थान बांधणे करिता म्हाप्रळ येथील शासकीय भूखंडापैकी दहा गुंठे भूखंड मागणी प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब यांचे मूळगाव आंबडवे येथे उभारण्यात आलेल्या मॉडेल कॉलेजचे अपूर्ण बांधकाम त्वरित सुरू करून पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंडणगड तहसील कार्यालयाची इमारत जुनी व नादुरुस्त असल्याने नवीन इमारत बांधणे करिता तांत्रिक व आर्थिक तरतूद करून नवीन इमारत बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. बाणकोट सागरी पोलीस ठाणे ता. मंडणगड येथील अधिकारी व कर्मचारी यांना निवासाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नवीन वाहन परवाना व नूतनीकरण (पासिंग) व्यवस्था पूर्वीप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यामधून महाड तालुक्याकडे क्षमतेपेक्षा जास्त व बेशिस्तपणे सुरू असलेल्या गौणखनिज (मायनिंग) वाहतूकीस आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यातील शासकीय कार्यालयामधील रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी करण्यात आली आहे. आंबडवे ते पंढरपूर राज्य मार्गाचे मंडणगडच्या हद्दीतील काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या प्रश्नाकडे लक्ष घालून गुणवत्तापुर्ण रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यामधील 108 ॲम्बुलन्स सेवा न मिळाल्याने रुग्णांचे होत असलेले हाल दुर करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास 1 जानेवारी 2024 रोजी मंडणगड तालुक्यातील जनतेची होत असलेली गैरसोय प्रशासनाकडून दूर करण्यात यावी व वरील समस्याबाबत लक्षवेधण्यासाठी बेमुदत धरणे-आंदोलन / उपोषण करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदनावर पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेश साळवी, माजी अध्यक्ष राजेश गमरे, राजेश खैरे, दिनेश राउत, जयवंत जाधव, सुनील मोरे, यांच्या सह्या आहेत.












