सावंतवाडी शहरालगतच्या गावातील जत्रोत्सवात ‘खुलेआम ‘ जुगार

crime jugar

पोलीसांचा आशीर्वाद की जाणीवपूर्वक दुर्लक्ष

पोलिसांच्या भूमिकेमुळे स्थानिकांमध्ये आश्चर्य

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरानजीकच्या एका गावात असलेल्या जत्रोत्सवात रविवारी रात्री खुलेआम जुगार सुरू होता. विशेष म्हणजे या जुगारात तरुणाईसह विदयार्थी दशेतील युवकांचा मोठा सहभाग होता. मात्र, शहरापासून जवळ व मुख्य रस्त्यालगत असलेल्या जत्रोत्सवात खुलामपणे सुरू असलेला हा जुगार पोलिसांच्या आशीर्वादातून की त्याकडे पोलिसांनी अर्थपूर्ण तडजोडीतून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते अशी कुजबूज परिसरात सुरू होती. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे लक्ष देतील का असा सवालही उपस्थित होत आहे.

सिंधुदुर्गात गेली अनेक वर्षे जत्रोत्सवातील जुगारावर पोलीस प्रशासनाने बंदी घातली आहे. या निर्णयाचे जनतेतून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले होते. कारण जुगारात अनेक तरुणांसह विद्यार्थी दशेतील युवकही सामील होत असल्याने त्यांच्या करिअरवर व आर्थिक परिस्थितीवरही त्याचा परिणाम होत होता. त्यामुळे गेली काही वर्षे जत्रोत्सवातील जुगार खुलेआम तरी बंद असलेले दिसत होते.

मात्र, रविवारी सावंतवाडी शहरा नजीकच्या एका गावातील जत्रोत्सवात मात्र खुलेआम जुगार सुरू होता. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि काही क्षणातच शेकडो तरुण जुगार खेळण्यासाठी जत्रोत्सवात दाखल झाले. पहाटे पर्यंत अगदी बिनदिक्कतपणे हा जुगार सुरू होता. याबाबत भाविक व ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. पोलीस प्रशासनालाबरोबर झालेल्या ‘सेटिंग ‘ मुळे हा जुगार सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.