वैभववाडी | प्रतिनिधी : भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्मृती प्रित्यर्थ कै.अरुण भार्गवे पुरस्कृत उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२२ श्री. शैलेंद्रकुमार परब यांना जाहीर झाला आहे.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्मृती प्रित्यर्थ ग्राहक चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै.अरुण भार्गवे पुरस्कृत कोकण विभागाचा पहिला उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२२ साठी संस्थेकडून विभागनिहाय प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्रत्येक विभागातून एक उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीने घेतला होता. कोकण विभागातून ग्राहक चळवळीला समर्पित होऊन ग्राहकांच्या समस्या, तक्रारी, प्रबोधन, करण्यात सक्रिय राहून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे वैभववाडी येथील सक्रिय कार्यकर्ते श्री.शैलेंद्रकुमार पांडुरंग परब यांच्या प्रस्तावाची दखल घेऊन हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय लाड व सचिव श्री.अरुण वाघमारे व राज्य कार्यकारिणीने जाहीर केला आहे. श्री.शैलेंद्रकुमार परब हे अनेक वर्षांपासून ग्राहक चळवळीचे कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व एका ग्राहकाभिमुख मासिकाची वार्षिक वर्गणी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दि.१५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात श्री. शैलेंद्रकुमार परब यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ग़्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
Home सिंधुदुर्ग वैभववाडी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार शैलेंद्रकुमार परब यांना जाहीर