महामंडळाच्या कलावंत, कामगार व मित्रमंडळीमुळे नाट्यस्पर्धा अव्याहतपणे सुरु : श्रीनिवास जोशी

वेंगुर्लेत सिंधुदुर्ग विभागाच्या आंतर विभागिय नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे शानदार उद्घाटन

वेंगुर्ले : दाजी नाईक
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गेली ५० वर्षे आंतर विभागिय नाट्यस्पर्धा अव्याहतपणे सुरु आहेत. त्याचे सारे श्रेय राज्य परिवहन महामंडळाच्या कलावंत, कामगार व त्यांच्या मित्रमंडळीना द्यावे लागेल. सलग चार वर्षे सिंधुदुर्ग विभागाच्या नाटकाला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले. कारण कोकणच्या मातीतच नाटक आहे असे प्रतिपादन मुंबई, पूणे प्रदेशच्या नियंत्रण समितीचे उप महाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागाच्या ५१ व्या आंतर विभागिय नाट्य स्पर्धा २०२३- २४ च्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन वेंगुर्ले न. प. च्या सुसज्ज अशा नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगुले यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून सिंधुदुर्गचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, वेंगुर्ले न. प. चे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, नाट्यस्पर्धेचे परिक्षक शाम नाडकर्णी, सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर, व मिताली महेंद्र मातोंडकर उपस्थित होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगुले यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी बोलताना श्रीनिवास जोशी पुढे म्हणाले की, या नाट्य स्पर्धेच्या एक दोन नाटकांमध्ये मी काम केले होते. त्यावेळी आमच्या विभागाला बक्षिसही मिळाले होते. त्यावेळी नाटकांसाठी आठ ते दहा हजार रुपये खर्च मंजूर व्हायचा. उर्वरीत खर्चासाठी वर्गणी काढावी लागायची. आता २५ हजार रुपये मिळतात. मात्र त्याला मंजूरी ध्यावी लागते. ते मंजूर न झाल्यास वर्गणी काढावी लागते. या स्पर्धा खऱ्या अर्थाने परिवहन मंडळातील कलावंत कामगार व त्यांच्या मित्र मंडळीनीच जीवंत ठेवल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.