नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामधील कॅन्टीनचा उद्घाटन सोहळा संपन्न
वेंगुर्ले : दाजी नाईक
महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक उन्नती साधून सक्षमीकरणासाठी सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत अन्न प्रकिया उदयोग, कृषी यांत्रिकीकरण, पशुपालन, कुक्कुटपालन, पर्यटन अशा प्रकारच्या विविध व्यवसायांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी वैयक्तिकरित्या अथवा महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.
सिंधुरत्न समृद्धी योजना अंतर्गत महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा व नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामधील कॅन्टीनचा उद्घाटन सोहळा मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदेचे प्रशासक श्री. प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ, तहसिलदार श्री. ओंकार ओतारी, डॉ. आनंद तेंडुलकर, प्रकल्प व्यवस्थापक, सिंधुरत्न समृद्धी योजना, श्री.योगेश वालावलकर, क्षेत्रीय अधिकारी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग (PMFME), शिवसेनेचे जिल्हा संघटक श्री. सचिन वालावलकर, वेंगुर्ली तालुकाप्रमुख श्री. नितीन मांजरेकर, शहर प्रमुख श्री. उमेश येरम, युवक शहर प्रमुख संतोष परब तसेच वेंगुर्ला शहरातील विविध बचत गटातील महिला, पत्रकार व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री केसरकर पुढे म्हणाले की, या योजनेअंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सर्व उदयानांमध्ये व पर्यटन स्थळी छोटी कॅन्टीन उभारण्यात येवून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच वेंगुर्ले येथे जानेवारीच्या पहिला आठवडयात भव्य महिला मेळावा आयोजित करुन प्रत्यक्ष लाभार्थ्यांसोबत सुसंवाद साधणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
डॉ. आनंद तेंडुलकर, प्रकल्प व्यवस्थापक, सिंधुरत्न समृद्धी योजना व श्री.योगेश वालावलकर, क्षेत्रीय अधिकारी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग (PMFME) यांनी या योजनेबाबत विस्तृतपणे माहिती देवून योजनेचा लाभ घेणेकामी आवश्यक प्रकियेबाबत मार्गदर्शन केले. तदनंतर वेंगुर्ला नगरपरिषदेचे प्रशासक श्री. प्रशांत पानवेकर यांनी जास्तीत जास्त महिलांनी या योजेनेचा लाभ घ्यावा व आपली आर्थिक प्रगती साध्य करावी असे आवाहन केले.
सिंधुरत्न योजनेची जनजागृती करण्यासाठी तसेच सदर योजनेबाबत महिलांच्या विविध अडचणी जाणून घेवून त्यांचे निराकारण करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये नियमितपणे एक खिडकी कार्यन्वित करण्यात येईल तसेच जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेवून रोजगाराच्या विविध संधी निर्माण करुन आपले जीवनमान उंचवावे असे मत मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. काका सावंत यांनी केले.











