संतोष वायंगणकर
भारतीय रेल्वेच नातं २० मार्च १९९३ सालपासून जोडलं गेलं आहे. कारण मुंबईतून सुरू झालेली आणि कोकणातून दक्षिणेकडे धावणारी रेल्वेचा याच दिवशी शुभारंभ झाला. पूर्वी मुंबईतच रेल्वे आणि रेल्वेचा प्रवास अनुभवलेले आम्ही १९९३, १९९६ आणि जेव्हा २६ जानेवारी १९९८ मध्ये कोकणातील डोंगर-दऱ्या पार करीत कोकण रेल्वे धावू लागली. त्यानंतर खऱ्याअर्थाने कोकणच्या जनतेने ‘याची देही याची डोळा’ रेल्वे अनुभवली. कोकणात रेल्वे खरच येऊ शकेल का ? असा प्रश्न माझ्यासह सर्वच कोकणवासियांच्या मनात सतत येत असायचा. परंतु तत्कालिन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस, अर्थमंत्री प्रा.मधु दंडवते यांच्या निर्णयाने आणि रेल्वे बोर्डाच्या अभियंत्यांच्या प्रयत्नाने कोकणातील डोंगर-दऱ्या पार करीत कोकण रेल्वे धड-धड कोकण रेल्वे मार्गावरील ट्रॅकवरून धावू लागली. कोकणरेल्वेच्या वाटचालीची आठवणही होण्याचे कारणही तसेच घडले. भारतीय रेल्वेच्या ६८ व्या रेल्वे सप्ताहाचा शानदान समारंभ नवी दिल्लीतील भारत मंडपम या प्रगती मैदानावरील सभागृहात नुकताच पार पडला. या भारतीय रेल्वेच्या या समारंभास उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. भारताचे रेल्वे वाहतुक, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री ना. अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभात भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये काम करत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना सन्मानित करण्यात आले होते. या दिल्लीतील समारंभाच्या निमित्ताने भारतीय रेल्वेची वाटचाल कोणत्या दिशेने कशी सुरू आहे हे निश्चितच समजून घेता आले. रेल्वेच्या दररोजचे असणारे प्रशासनातील प्रश्न ते सोडवण्यासाठी घेतले जाणारे परिश्रम आणि रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा रेल्वेचा असलेला प्रयत्न कशारितीने सुरू आहेत. या प्रयत्नांना कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नातून निश्चितच रेल्वेच्या कार्यपद्धतीत बदल करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व क्षेत्रिय आणि विभागिय आरोग्य युनिट्सच्या रूग्णालयांच्या माहिती व्यवस्थापन प्रणालीचे डिजीटलायझेशन पुणे येथे सुसज्ज ऑफरेशन थिएटर सुरू करण्यात आले आहे. झोनमध्ये ६३ स्टॉलची स्थापना करून ‘वनस्टेशन वन प्रॉडक्ट’ उपक्रमातून ‘वोकल फॉर लोकल’ व्हीजनलाही प्रोत्साहन देण्यात आले आहे. रेल्वेच्या प्रगतीच्या वाटेवर सौरऊर्जेचाही प्रयोग करण्यात आला आहे. या प्रयोगातही रेल्वेने चांगल यश संपादन केले आहे. या समारंभात शंभरावर अधिकारी कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे हा शंभरावर अधिकाऱ्यांचा सन्मान केंद्रिय रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. यावेळी सन्मानित होणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांशी रेल्वेमंत्री वैष्णव संवाद साधत होते. त्याच्या-त्याच्या कामगिरीबद्दल पाठीवर कौतुकाची थाप देत प्रोत्साहीतही करत होते. एखाद्या ट्रॅकमन, रेल्वेचा सुरक्षा रक्षक ते विभागिय प्रमुख अधिकाऱ्यापर्यंत सर्वांशीच मंत्री वैष्णव यांच असलेलं नात, जिव्हाळा रेल्वेच्या भविष्यकालिन वाटचालीतही महत्वपूर्ण ठरणार आहे यात शंका नाही. भारतीय रेल्वेने विद्युतीकरणावर भर देत रेल्वे प्रवासातील डिझेल गाड्यांमुळे वाढणारा वेळ कमी तर झालाच परंतु त्याचबरोबर मोठ्याप्रमाणावर आर्थिक बचतही होऊ शकली. भारतीय रेल्वेने नविन तंत्रज्ञानही अंगीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘वंदेभारत एक्सप्रेस’ सारख्या आकर्षक लुकमधील रेल्वे गाड्या रेल्वे ट्रॅकवर आल्या आहेत. तर ‘पशुपुल’ तंत्रज्ञानाद्वारे आधारित भारतीय रेल्वेने विकसित केलेली ‘अमृतभारत ट्रेन’ या सर्वांचा विचार करत असताना जगामध्ये भारतीय रेल्वे अव्वलस्थान निर्माण करण्याच्या योग्य ट्रॅकवर कार्यरत झाली आहे. २०२७ मध्ये जगातील रेल्वेच्या प्रगतीच्या बाबतीत २०२७ पर्यंत ट्रॉप थ्री देशांमध्ये भारत आपलं स्थान निश्चित करेल असे आपणाला विश्वासाने म्हणता येईल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या समारंभात व्यक्त केला. २०२७ साल त्यांनी निश्चित केलेले असताना भारतीय रेल्वेच्या प्रगतीचा आलेख सांख्यिकीदृष्ट्या कसा वर आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत. भारतीय रेल्वेची स्थापना आणि त्यानंतरची तिची वाटचाल रेल्वे प्रगतीचा असलेला योग्य ट्रॅक पकडला आहे. यामुळे भारतीय रेल्वेचा खऱ्याअर्थाने सध्याचा ‘सुवर्णकाळ’ सुरू झाला आहे. असे म्हणता येईल.












